भोर : तालुक्यातल धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरादार बेंटिंग सुरू आहे. शुक्रवारी ब्रिटिशकालीन भाटघर धरणातीलपाणीसाठ्याने शतकाकडे आगेकूच करण्यास सुरुवात केली आहे. धरण ९९ टक्के भरले असून भोंगा वाजवून धरणाच्या ४५ स्वयंचलित दरवाजांची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली.
यावेळी एका दरवाजातून ४१२ क्युसेक याप्रमाणे ४५ दरवाजांतून सुमारे १८ हजार ५४० क्युसेकने विसर्ग करण्यात आला, यावेळी पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांच्या हस्ते जलपूजन केले. यावेळी सहायक अभियंता योगेश भंडलकर, शाखा अभियंता गणेश टेंगळे, नाना कांबळे उपस्थित होते.
भाटघर धरण १९२७ साली ब्रिटिशांनी बांधले असून संपूर्ण धरण दगडी बांधकाम आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता २४ टीएमसी असून धरणाला ४५ स्वयंचलित दरवाजे आहेत. धरण १०० टक्के भरले की दरवाजे आपोआप उघडतात तर ३६ रोलिंगचे दरवाजे आहेत.
धरणाच्या ८१ दरवाजातून एकावेळी सुमारे ५७ हजार क्यूसेसने पाणी बाहेर पडण्याची क्षमता आहे. दरम्यान निरादेवघर धरण ९४ टक्के भरले आहे. धरणामध्ये सुरू असणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेता निरा देवघर धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्राद्वारे सुरू ७५० क्युसेक विसर्ग मध्ये वाढ करून सांडव्या द्वारे २६५३ क्युसेक असा एकूण ३४०३ क्युसेक विसर्ग नदी पात्रामध्ये सुरू करण्यात येत आहे.
नदीपात्रात उतरू नये नदीच्या पात्रात कुठल्या विभागाचे काम सुरू असेल तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून केले आहे.
अधिक वाचा: Ujani Dam Water Level: उजनीत मागील ८ दिवसांत आलं किती पाणी.. धरण शंभरी पार