मंचर : हिरडा पिकाला लवकरच नुकसानभरपाई संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास शासन सुरुवात करत आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दिली.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी संयुक्तरीत्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेतली.
त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यामध्ये ३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे हिरडा या शेतमाल पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सदर नुकसानीबाबत तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केला होता.
सदर अहवालानुसार राज्य शासनाने १५ कोटी ४८ लाख रुपयांची मदत म्हणून जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरून घोषणा केली होती.
त्यानुसार राज्य शासनाकडे महसूल व वन विभागाने शासन निर्णय क्रमांक सी.एल.एस/ २०२३/प्र.क्र. ११२/म-३ मुंबई, दिनांक १२.३.२०२४ अन्वये नुकसानभरपाई वाटपाबाबत आदेश निर्गमित केलेले आहेत.
या कामी तीन महिन्यांचा कालावधी होऊनही प्रशासनाने बाधित आदिवासी शेतकऱ्यांना मंजूर नुकसानभरपाईचे वाटप केलेले नाही, असा आरोप जिल्हाप्रमुख भोर यांनी केला होता.
सरसकट मिळणार मदत
हिरड्याची झाडे ही प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मालकीच्या जमिनीवर व बांधावर विखुरलेल्या स्वरूपात नैसर्गिकरीत्या उगवतात व सदर झाडांपासून हिरड्याचे उत्पन्न घेतले जाते. निसर्ग चक्रीवादळामुळे या भागाचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत मदत द्यायची हे सरकारचे धोरण होते, परंतु काही शेतकऱ्यांचा पंचनामा लाखाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आता सरसकट सर्व बाधित शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
अधिक वाचा: राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून अनुदान जाहीर, वाचा सविस्तर