शिरोळ : शुगरकॉन-२०२४ आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या आयोजन समितीने श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला सब-सरफेस ड्रेनेज (एसएसडी) प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर व उत्पादकतेवर परिणाम या शिर्षकाचा शोधप्रबंध स्वीकारला आहे.
१६ ते १९ सप्टेंबरदरम्यान आयसीआयएसएफ, क्यू न्होन, रिन्ह दिन्ह व्हिएतनाम येथे आयोजित आयएपीएसआयटी आठव्या आंतरराष्ट्रीय साखर परिषद व शुगरकॉन २०२४ परिषदेत याचे मौखिक सादरीकरण होणार आहे, अशी माहिती गणपतराव पाटील, अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लवचीक आणि शाश्वत जागतिक साखर उद्योग आणि जैव ऊर्जा उद्योग : साखर क्षेत्राचे रूपांतर या विषयावरील आगामी आंतरराष्ट्रीय परिषदेला वीस साखर उत्पादक देशांतील २५०हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील. शुगरकॉन-२०२४ परिषदेनंतर विविध साखर कारखान्यांना भेट दिली जाईल.
शुगरकॉन-२०२४ ही इतर साखर उत्पादक देशांच्या सदस्य, संस्थांसह बहुभागधारक भागीदारी प्रवास तयार करण्याची व जागतिक स्तरावर संशोधनासह व्यावसायिक संधी शोधण्याची एक उत्तम संधी असेल. शुगरकॉन-२०२४ चे आयोजन सचिव जी. पी. राव यांनी सहभागी होण्यासाठी कारखान्याला पत्र पाठवून ही माहिती दिली आहे.
जयपूर, राजस्थान येथे शुगर टेक्नॉलॉजी ऑफ इंडियाच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये श्री दत्त कारखान्याच्या वतीने सलग ऊस पीक जमिनीमध्ये घेतले तर जमिनीचा कस कमी होतो असा समज होता; परंतु कारखाना माती परीक्षण विभागाकडे उपलब्ध सर्व माती अहवालानुसार जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला तर जमिनीचा कस कमी होत नाही, असा संशोधन प्रबंध सादर केला, कोईमतूर येथील शास्त्रज्ञ श्री बक्षीराम यांनी कारखान्याने क्षारपड मुक्तीच्या केलेल्या कामाची प्रशंसा केली होती.
तसेच इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्ससाठी एक संशोधन पेपर सादर करण्यास सांगितले. त्यानुसार कारखान्याकडून वरील संस्थेकडे प्रबंध सादर केला. त्या प्रबंधाची इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्समध्ये निवड झाली.