रऊफ शेख
गेल्या काही दिवसांपूर्वी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील तीनपैकी सांजूळ आणि फुलंब्री हे दोन मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून त्याच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. मात्र, वाकोद प्रकल्पात केवळ ४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात सुरुवातीला मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे या पावसाने तालुक्यातील एकही मध्यम आणि लघु प्रकल्पात पाणी आले नाही; परंतु खरीप पिके चांगली बहरली. १ ते ६ सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील काही महसूल मंडळांत जोरदार पाऊस झाल्यामुळे सांजूळ आणि फुलंब्री हे दोन मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून त्याच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे.
फुलंब्री प्रकल्पातील पाणी साठवण क्षमता ५.८ दशलक्ष घनमीटर आहे. सांजूळ प्रकल्पाच्या सांडव्यातील पाणी आणि बिल्डा येथील डोंगरकड्यातून पावसाचे वाहून येणारे पाणी थेट फुलमस्ता नदीतून ते फुलंब्री प्रकल्पात येते. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
तर फुलंब्री प्रकल्पाच्या सांडव्यातून निघणारे पाणी गिरिजा नदीच्या पात्रात जात आहे. वाकोद मध्यम प्रकल्प मात्र ४ टक्केच भरला आहे. या प्रकल्पात गिरिजा नदीच्या पात्रातील वाहून जाणारे पाणी वळविण्याचे काम सुरू आहे.
अनेक तलावांतही पाणी साठण्यास सुरुवात
■ तालुक्यातील गणोरी लघु प्रकल्प शंभर टक्के भरला असून जातेगाव तलावात ५० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याशिवाय डोंगरगाव ६० टक्के, बाभूळगाव ३५ टक्के, पिरबावडा ७० टक्के आणि निधोना तलावात ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
■ तसेच गिरिजा नदी वाहत असल्याने वडोद बाजार येथील कोल्हापुरी बंधारा तुडूंब भरल्याने ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गावातील तरूण या कोल्हापुरी बंधाऱ्यात दररोज पोहण्याचा आनंद घेत आहेत.
हेही वाचा - Rain In Marathwada : मराठवाड्याच्या 'या' सहा जिल्ह्यांत झाला १०० टक्के पाऊस