संतोष धुमाळ
सातारा : राज्यातील ऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, जवळपास १२० कारखान्यांचा चालू वर्षीचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. सद्य:स्थितीत १,०३७ लाख ८९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, सरासरी १०.२१ टक्के उताऱ्यानुसार १,०५९ लाख २२ हजार क्विंटल इतके साखरेचे उत्पादन तयार झालेले आहे.
चालू वर्षी राज्यात १०३ सहकारी व १०४ खासगी मिळून २०७ कारखान्यांकडून साखर उत्पादन सुरू होते. त्यांपैकी १२० साखर कारखाने २७ मार्चअखेर बंद झाल्याची माहिती साखर सहसंचालक राजेश सुरवसे (विकास विभाग), साखर सहसंचालक सचिन भराटे यांनी दिली आहे.
चालू वर्षी ऐन पावसाळी हंगामात पर्जन्यमान कमी झाल्याने, उसाची किमान वाढ न झाल्याने व शेवटच्या टप्प्यात पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने उसाचे, पर्यायाने साखरेचे अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने व बहुतांश ऊसतोड कामगार गावी परतल्याने उपलब्ध ऊसतोडीस विलंब होत आहे. पाण्याअभावी वाळून गेलेला ऊस ऊसतोड कामगार जाळून ऊसतोडणी करत आहे. त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे सर्वच भागातील बळीराजामधून संताप व्यक्त केला जात आहेत.
राज्यात ऊसगाळप, साखर उत्पादन व उताऱ्यात कोल्हापूर विभागाने आघाडी कायम राखली आहे. त्या खालोखाल पुणे विभाग दुसऱ्या स्थानावर आहे. गतवर्षी २०२२-२३ च्या हंगामात २७ मार्चअखेर एकूण २११ कारखान्यांनी १,०५० लाख २५ हजार टनांइतके ऊस गाळप पूर्ण केले होते.
तर ९.९८ टक्के सरासरी उताऱ्यानुसार १०४७ लाख ९१ हजार क्विंटल इतके साखर उत्पादन झाले होते; तर १८८ कारखान्यांचे गाळप २७ मार्चअखेर बंद झाले होते. गळीत हंगाम संपला असल्याने ऊसतोड मजूरही आपापल्या गावाकडे निघाले आहेत.
२७३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
२७ मार्चअखेर प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात कोल्हापूर विभाग ऊसगाळप, साखर उत्पादन व उतार्यात आघाडीवर आहे. कोल्हापूर विभागात ४० कारखान्यांद्वारे २३७ लाख ३१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे; तर सरासरी ११.५३ टक्के उताऱ्यासह २७३ लाख ५३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करत कोल्हापूर विभागाने गाळप, उत्पादन व उताऱ्यात आघाडी कायम राखली आहे.
राज्यातील विभागनिहाय २७ मार्चअखेर ऊसगाळप, साखर उत्पादन व उतारा
विभाग | ऊस गाळप (लाख मे. टन) | साखर उत्पादन (लाख क्विंटल) | उतारा (टक्के) |
कोल्हापूर | २३७.३१ | २७३.५३ | ११.५३ |
पुणे | २२८.६७ | २७३.५३ | १०.४४ |
सोलापूर | २११.४० | १९८.०८ | ९.३७ |
अहमदनगर | १३४.५५ | १३३.२७ | ९.९० |
छत्रपती संभाजीनगर | ९६.१४ | ८५.५९ | ८.९० |
नांदेड | ११६.३३ | ११८.७७ | ५.८७ |
अमरावती | ९.७१ | ९.०७ | ९.३४ |
नागपूर | ३.७८ | २.२२ | ५.८७ |
शेतकऱ्यांनी ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासोबतच एकरी उत्पादनवाढीवर भर देण्याची गरज आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान, लागवड, खत, पाणी यांचे सुयोग्य व्यवस्थापन केल्यास एकरी ऊस उत्पादनात वाढ होईल. अजिंक्यतारा सहकारी कारखान्याकडून याबाबत आयोजित परिसंवाद, शिबिरे यांचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याने अजिंक्यतारा कारखाना साखर उताऱ्यात आघाडीवर आहे. - जिवाजी मोहिते, कार्यकारी संचालक, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना