शेती करायची आवड आणि जिद्द असेल, तर पाणीटंचाईवरही मात करता येते आणि भर उन्हाळ्यात रोज ताजे पैसे मिळवता येतात हे सिद्ध करत आहे, खान्देशचा जिद्दी तरूण सागर भोई. हाडाचा शेतकरी असलेला सागर सध्या नाशिकजवळील भगूर या गावातील शेती बटाईने घेऊन शेती करतोय. इतकेच नव्हे, तर आलेला शेतमाल स्वत: नाशिक शहरात विकतोय आणि रोज ताजे पैसेही कमावतोय.
ही कहाणी आहे सागरच्या मेहनतीची, कष्टाची आणि शेतमाल विक्रीच्या तंत्राचीही. सध्या मुंबई महामार्गावरच्या मोक्याच्या ठिकाणी सागरची स्कुटर उभी असते आणि त्यावर एक फळी व कापड टाकून लांब आकाराच्या हिरव्यागार पाणकाकड्यांची तो विक्री करतो. उन्हाळ्यात काकड्या मनाला आणि शरीराला थंडावा देतात, त्यात पाणकाकडीचे उन्हाळ्यात तर अधिक महत्त्व.
रेषेदार असलेल्या या काकड्यांची चवही न्यारी असते. सध्या या काकड्या दुर्मीळ होत असल्याने शहरी ग्राहकही त्याकडे पटकन आकर्षिला जातो. जे दुर्मीळ, जे वेगळं ते विकलं जातं हे विक्रीचं तंत्र सागरनं चांगलंच आत्मसात केलंय. म्हणूनच रोजच्या रोज काकड्यांच्या विक्रीतून तो ताजा पैसा कमावतोय.
सागर बापू भोई हा फळशेतीमध्ये तरबेज आहे. उन्हाळ्याच्या काळात खान्देशात अनेक भागांत पाण्याची टंचाई असते. त्यामुळे तेथे शेती करणे अवघड असते. अशा वेळेस दरवर्षी तो नाशिक जिल्ह्यातील भगूर परिसरातील शेती भाडेतत्वावर (बटाईने) घेऊन त्यात काकडीचे लागवड करतो. इतकेच नव्हे, बटाईने पेरू, आंबे, नारळ यांचीही शेती तो करतो. यंदा त्यानं दीड बिघा जमिनीवर पानकाकडीची लागवड केली आहे. लागवडीनंतर साधारणत: सव्वा ते दीड महिन्यात ही काकडी तयार होते. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांपर्यंत दररोज सुमारे ३ ते ४ क्रेट उत्पादन मिळते.
तयार झालेला शेतमालाची सागर दोन प्रकारे विक्री करतो. शक्य झाल्यास व्यापाऱ्यांना चांगल्या भावाने क्रेटची विक्री करतो. तसेच तो स्वत:चही स्कूटरवर नाशिक शहरात मोक्याच्या जागी पानकाकडीची विक्री करतो. ३० रुपये पावशेर किंवा १०० रुपये किलो असा त्याचा दर आहे. त्यातून त्याला किलोमागे १०० ते १२० रुपये सहज सुटतात. स्थानिक गावठी वाण असणारी ही पानकाकडी दिसायला आणि चवीला वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे विक्रीला सुरूवात होताच काही तासांच सागरकडचा माल हातोहात खपतो. त्यातून त्याल रोजच ताजा पैसा मिळतो. त्यातून उन्हाळ्याच्या तीन महिन्यांच्या काळात त्याला सुमारे १ ते १.२५ लाखांचे उत्पन्न होते. शेतकऱ्याला बटाईपोटी ३० हजार रुपये, लागवड देखभाल खर्च २० हजार वजा जाता निव्वळ नफा ७० ते ७५ हजार रुपये मिळत असल्याचे सागर सांगतो.
सागरकडे विक्रीचे चांगले तंत्र असून येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांशी अगत्याने कसे बोलावे, आपल्या मालाबद्दल त्यांना कसे पटवावे हेही त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे. ग्राहकांना पानकाकडीचे उपयोग आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वही तो सांगतो. लहान मुलांना उतरतं ऊन लागलं आणि ताप आला, तर या पानकाकडी आणि कांद्याचा एकत्र किस करून तो त्यांच्या अंगाला लावल्यास सुमारे दहा मिनिटांत ताप उतरतो, यासारखे उपायही तो ग्राहकांना सांगत असतो.
मागील काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या काळात सागर पानकाकडीची लागवड आणि शहरात विक्री करतो. छोट्या स्कुटरवर हा व्यवसाय असला, तरी त्याने अनेक ग्राहक आता बांधून ठेवले आहेत. हे ग्राहक नियमितपणे त्याच्याकडून काकडी खरेदी करतात. त्यामुळे त्याला आता बाजार शोधण्याची चिंता नसते.
पानकाकडी शिवाय तो पेरू, आंबा यांचीही बटाईने देखभाल, लागवड व विक्री करतो. शहरात अनेक लोक असे आहेत, की ज्यांचे फार्महाऊस असते, पण त्यांना शेती करता येत नाही. अशांचे शेत भाडे तत्वावर, बटाईने घेऊन सागर त्यातूनही उत्पन्न मिळवतो. त्याची गावी शेती आहे, पण शहरात शेती नसतानाही तो शेती करतोय आणि बंपर उत्पन्नही मिळवतोय, हे ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
पाणकाकडी हे स्थानिक वाण आहे. शेतकी शास्त्राच्या भाषेत त्याला वाईल्ड व्हरायटी म्हणतात. या स्थानिक किंवा गावरान काकड्यांचे अनेक प्रकार आहेत. वाळके, चिबड अशा अनेक स्थानिक प्रजाती काकड्यांच्या असतात. मात्र कृषी विद्यापीठांनी त्यावर सखोल संशोधन करणे गरजेचे आहे.