पेण : दोन दिवसांपासून पडलेल्या चांगल्या पावसामुळे वाशी खारेपाट विभागातील तलावमालकांची मत्सबीज सोडण्यासाठी लगबग वाढली आहे. प. बंगालमधील केंद्रातून त्यांनी या बीजांची ऑर्डर दिली होती. सुमारे अडीच लाख मत्स्यबीजे या केंद्रांतून शेतकऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आली आहेत.
खारेपाटण विभागात शेतीपूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन व्यवसाय भरभराटीस आला आहे. जुलै महिन्यात सोडण्यात आलेले हे बीज मार्च २०२५ अखेरीस माशांमध्ये रूपांतरित होऊन विक्रीसाठी उपलब्ध होतात.
खाद्य मुबलक प्रमाणात मिळाल्यास मासे आठ महिन्यांत एक किलो वजनाचे होतात. साधारणपणे ११ मि.मी. वाढ झालेली मत्स्यबीजे तलावामध्ये सोडण्यासाठी योग्य व अनुकूल समजले जातात.
मत्स्यबीज दर (प्रतिबॅग)
मोठे बीज : ७०० रु
लहान बीज : ३०० रु
शेतीपूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन व्यवसायाने गेल्या काही वर्षात चांगलेच बाळसे धरले आहे. एका प्लास्टिकच्या पिशवीत साधारणपणे आकारानुसार मत्स्यबीजे येतात. यामध्ये मोठी ३०० तर त्यापेक्षा लहान ४०० ते ४५० एवढी मत्स्यबीजे येतात. मोठे बीज ७०० रुपये प्रतिबॅग, तर लहान बीज आकारानुसार अनुक्रमे २००, ३००, ४०० रुपये या दरानुसार मिळतात. यामधे मुख्य रोहू कटला, कटला, सायप्रिस आणि अन्य प्रकारच्या माशांच्या जातींचा समावेश असतो. महत्त्वाचे म्हणजे निमखाऱ्या आणि खारजमीन शेततळ्यात चवीला मासे रुचकर व चविष्ट असल्याने शेततलावधारकांना जागेवरच मार्केट उपलब्ध झाले आहे. - राजन होमसे, मत्स्यतलाव पालक, वाशी, ता. पेण