करमाळा : तालुक्यात तब्बल २३,५०० हेक्टर क्षेत्रावर उडदाची लागवड असून, यावर्षी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक होण्याची लक्षणे आहेत. सध्या उडदाला सरासरी साडेआठ हजार रुपये इतका भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
उडदास किमान ७,५०० ते कमाल ८,७०० व सरासरी ८,५०० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळत आहे. करमाळा तालुक्यात उजनी, सीना कोळगाव कुकडीच्या पाण्यामुळे बागायत क्षेत्राची वाढ झाली आहे.
ऊस, केळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असले तरी हमखास चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या भुसार पिकांमध्ये करमाळा बाजार समितीत तूर, मका, ज्वारी, हरभरासह उडदाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते.
गतवर्षी दुष्काळी परिस्थिती असूनही करमाळा बाजार समितीमध्ये ज्वारीचीदेखील मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. सन २०२३ मध्ये ज्वारीची ३४ हजार क्विंटल आवक आली होती.
तर जानेवारी २०२४ पासून आत्तापर्यंत तब्बल ६५ हजार क्विंटल ज्वारीची आवक करमाळा मार्केट यार्डमध्ये झाली आहे. ज्वारीला किमान २,४०० पासून कमाल ४,६०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळत आहे.
शेतकऱ्यांसमोर लिलाव
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसमोर उघड लिलाव, त्वरित मापे व चोवीस तासात शेतमाल विक्रीची पट्टी देण्याची व्यवस्था असल्यामुळे करमाळा तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा भुसार शेतमाल विक्रीसाठी करमाळा बाजार समिती येतो. शेतकरी, व्यापारी, खरेदीदार, हमाल-तोलार यांच्यात योग्य असा समन्वय असल्यामुळे याचा चांगला परिणाम दिसून येतो असे सभापती जयवंतराव जगताप यांनी सांगितले.
आवाराबाहेर शेतमाल खरेदीचे प्रकार काही फडीवाल्यांकडून होत असून, या मधून शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणुकीचे काही प्रकार घडत आहे. शेतकऱ्यांनी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी आपला शेतमाल बाजार समितीमध्येच विक्रीसाठी आणावा व शासनाकडूनदेखील अशा प्रकारांवर निर्बंध लादण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. - विठ्ठल क्षीरसागर, सचिव, बाजार समिती, करमाळा