टेंभुर्णी: परतीचा मान्सून पावसाने उजनी पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने उजनी धरणातून भीमानदीत ३० हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे.
दौंड येथून सायंकाळी १० हजार ५०८ क्युसेक विसर्ग सुरू असून, पुणे जिल्ह्यातदेखील पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने दौंड येथील विसर्गात वाढ होणार आहे. उजनी धरणाचीपाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला आहे.
५ ऑगस्टपासून उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग सोडण्यात येत होता. तो ११ सप्टेंबर रोजी बंद करण्यात आला होता. मात्र तीन दिवसांपासून भीमा खोऱ्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने २४ रोजी सायंकाळी पाच हजार क्युसेकने पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
बुधवारी सायंकाळी हा विसर्ग ३० हजार क्युसेक करण्यात आला आहे. बुधवारी पुणे शहरात व जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून, यामुळे बंडगार्डन येथील विसर्गातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
सध्या बंडगार्डन येथून ५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. सध्या उजनी धरणातून उजनी मुख्य कालवा १ हजार ८०० क्युसेक, वीजनिर्मिती १ हजार ६००, दहीगाव ६० तर भीमा-सीना जोडकालव्यातून ४० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
सध्या उजनी धरणाची पाणीपातळी १०९.४५ टक्के असून, एकूण पाणीसाठा १२२.२९ टीएमसी असून ५८.६४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. १ जूनपासून उजनी पाणलोट क्युसेक एकूण ४८७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
या वर्षी दि. ९ जूनपासून दौंड येथील विसर्ग सातत्याने सुरू असल्याने कमी कालावधीत उजनी धरण शंभर टक्के भरू शकले.