टेंभुर्णी: भीमा खोऱ्यात पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौंडसह उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शुक्रवारी (दि. ३०) रात्री नऊ वाजता दौंड येथून १८ हजार ५०७ क्युसेक उजनी धरणात मिसळत आहे.
उजनीतूनदेखील विसर्ग कमी करण्यात आला आहे. उजनीतून भीमा नदीत ३५ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. गुरुवार सकाळपासून घट होत गेली.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजता दौंड येथून २८ हजार ४३८ क्युसेक विसर्ग चालू होता, तर उजनीतून ७१ हजार ६०० क्युसेक भीमा नदीत सोडण्यात येत होता.
शुक्रवारी सकाळपासून उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात निम्याने घट करण्यात आली आहे. सकाळी ६१ हजार ६०० क्युसेक विसर्ग भीमा नदीत सुरू होता. उजनी धरणाचीपाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे.
सध्या उजनी धरणाची पाणी पातळी १०४.२४ टक्के यावर ठेवण्यात आली आहे, तर ११९.५० टीएमसी पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ५५.८४ टीएमसी आहे.
सध्या उजनीतून मुख्य कालवा १ हजार ६०० क्युसेक, भीमा-सिना जोड कालवा २००, सिना-माढा उपसा सिंचन योजना १७५, तर दहिगाव ८० क्युसेक विसर्ग शेतीसाठी सोडण्यात येत आहे. वीज निर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.