टेंभुर्णी : भीमा खोऱ्यात पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड येथील विसर्गात मोठी घट झाली असून, उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही २० हजार क्युसेकने घट करण्यात आली आहे. त्यामुळे ९० हजारांवरून आता ७० हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
उजनीतून गेल्या तीन दिवसांपासून ८० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत सुरू होता. दौंड येथील विसर्गात वाढ होत गेल्याने बुधवारी वाढ करून ९० हजार क्युसेक करण्यात आला होता. दौंड येथून बुधवारी सायंकाळी विसर्ग वाढला होता.
गुरुवारी सकाळपासून घट होत गेली. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता दौंड येथून २८ हजार ४३८ क्युसेक विसर्ग चालू होता. तर उजनीतून ७१ हजार ६०० क्युसेक भीमा नदीत सोडण्यात येत आहे. उजनी धरणाची पाणी पातळी स्थीर ठेवण्यासाठी उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे.
सध्या उजनी धरणाची पाणी पातळी १०५.१४ टक्के यावर ठेवण्यात आली आहे. तर ११९.९८ टीएमसी पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ५६.३३ टीएमसी आहे. ९ जूनपासून दौंड विसर्ग सातत्याने कमी अधिक प्रमाणात चालू आहे.
सध्या उजनीतून मुख्य कालवा १ हजार ६०० क्युसेक, भीमा-सीना जोड कालवा २००, सीना-माढा उपसा सिंचन योजना १७५, तर दहिगाव ८० क्युसेक विसर्ग शेतीसाठी सोडण्यात येत आहे. वीज निर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.