गणेश पोळ
टेंभुर्णी : भीमा खोऱ्यातील उजनीच्या वर लहान मोठी २२ धरणे आहेत. शेती, उद्योग व पिण्याचा पाण्यासाठी उजनी धरणाचा गेल्या ४५ वर्षात सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्याला फायदा झाला आहे.
भीमाशंकर ते उजनी धरण २५० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून पाणी उजनी धरणात येते. भीमा खोऱ्यातील १९ धरणामधून पाणी उजनी धरणात दौंड येथे नदीद्वारे मिसळते.जून १९८० साली निर्मिती झालेल्या उजनी धरणाचा भीमा नदीचा उगम पश्चिम घाटातील भीमाशंकर येथे होतो. त्याला सह्याद्रीच्या पर्वत रांगा ही म्हणतात.
उजनी कधी शंभर टक्के भरते, याकडे शेतकरी लक्ष ठेवून असतात. यामुळे उजनी धरण वरदायिनी म्हणून ओळखले जाते. दौंड येथील पाण्याचा विसर्ग किती येतोय याची चर्चा सातत्याने होत असते. भीमा खोऱ्यातील १९ धरणांमधून उजनी धरणात पाणी येते.
किलोमीटरचा प्रवास
भीमा खोऱ्यातील भीमाशंकर ते उजनी धरण असा २५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे. माणिकडोह घोड ते दौंड १६२ किलोमीटर, डिंभे घोड ते दौंड- १५३ किलोमीटर, चासकमान ते दौंड १४२ किलोमीटर, पवना व मुळशी ते दौंड- १४६ किलोमीटर, पानशेत-खडकवासला ते दौंड १३३ किलोमीटर प्रवास करून पाणी उजनी धरणात मिसळते तर दौंड ते उजनी धरण दरवाजे १४६ किलोमीटर अंतर आहे. पवना, मुळशी, टेमघर, वरसगांव, पानशेत, कासारसाई व खडकवासला धरणाचा एकत्रित विसर्ग बंडगार्डन येथे जमा होतो.
भीमा खोऱ्यातील १९ धरणातून उजनी धरणात पाणी
■ चिलईवाडी, पिंपळगाव जोगे धरणातून पुष्पवती तलावात या तलावातून पुढे येडगांव धरणात तसेच माणिकडोह धरणातून थेट येडगांव धरणात पाणी मिसळते. या सर्व धरणांचे पाणी घोड धरणात मिसळले जाते. विसापूर धरणाचे पाणी पुढे घोड नदीतून दौंड येथील विसर्गात मिसळले जाते.
■ वडज धरणातून मीना नदीव्दारे घोड नदीतून घोड धरणात तसेच डिंभे धरणातून थेट घोड नदीद्वारे घोड धरणात पाणी मिसळते.
■ चासकमान व भामा आसखेड धरणांचे पाणी भीमा नदीव्दारे थेट दौंड येथील विसर्गात मिसळले जाते.
■ आंध्रा, वडीवळे धरण व वळवण तलावातील पाणी इंद्रायणी नदीद्वारे थेट भीमा नदीतून दौंड येथील विसर्गात मिसळले जाते.
■ पवना व कासारसाई धरणाचे पाणी पवना नदीद्वारे बंडगार्डन पुणे येथे मिसळले जाते.
■ मुळशीचे पाणी मुळा नदीव्दारे पुणे बंडगार्डन येथे विसर्ग मिसळला जातो.
■ टेमघर, वरसगांव, पानशेत धरणातील पाणी मुठा नदीद्वारे खडकवासला धरणात मिसळते खडकवासला धरणातून पुढे बंडगार्डन येथे एकत्र येऊन मुळा मुठा नदीद्वारे पुढे दौंड येथील विसर्गात मिसळले जाते.
८ जुलै रोजी उजनी धरणाची स्थिती
दौंड विसर्ग - ५ हजार ४१०
एकूण टीएमसी - ४३.२३
टक्केवारी - वजा ३८.१३
८ जुलै २०२३ - वजा ३६.१४