सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी रात्री आठ वाजता ८० टक्के भरले असून, शंभर टक्के भरण्यासाठी अवघे २० टक्के पाणी पातळी कमी आहे. सध्या उजनी धरणात एकूण १०५. ४४ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ४१.७८ क्युसेक उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. आणखी दोन दिवस दौंड येथील विसर्ग असाच चालू राहिल्यास उजनी शंभर टक्के भरणार आहे.
सध्या दौंड येथून ६८ हजार ६०० क्युसेकने उजनी धरणात पाणी मिसळत आहे. उजनी पूर्ण क्षमतेने भरत आले असतानाही उजनी कालवा, भीमा-सीना जोड कालवा व सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. मात्र, पाटबंधारे अधिकाऱ्यांनी कधी पाणी सोडण्यात येणार याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
भीमा खोऱ्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरत आल्याने धरणांची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी मुळशी व खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. सकाळी ११ वाजता बंडगार्डन येथून ४१ हजार ५०० क्युसेक सुरू होता. दुपारी तीन वाजता मुळशी धरणातून २० हजार १७७ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे, तर खडकवासला धरणातून दुपारी १२ वाजता २७ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. सकाळच्या तुलनेत सायंकाळी दौंड येथील विसर्गात मोठी वाढ झाली आहे.
उजनी आज ९० टक्के गाठणार
दौंड येथून ६८ हजार ६०० क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत असल्याने उजनी रविवार सायंकाळपर्यंत ९० टक्क्यांचा आसपास जाण्याची शक्यता आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत आल्याने दौंड येथून किती क्युसेक उजनी धरणात मिसळतोय. त्याप्रमाणे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात विसर्ग सोडला जाऊ शकतो.
असे असतानाही सीना-माढा उपसा सिंचन योजना, भीमा-सीना जोड कालवा व उजनी डावा उजवा या कालव्यातून पाणी सोडल्यास जिल्ह्यातील अनेक पाझर तलाव, आष्टी तलाव, अनेक छोटीमोठे तळी भरून घेण्यासाठी व शेती सिंचनासाठी याचा फायदा होणार आहे. या योजनातून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.