राज्यावर पूर्वमोसमी पावसाचे ढग घोंगावत असून राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची (Pre Monsoon alert Maharashtra) शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील ३१ जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या राज्यात मान्सूनला पोषक वातावरण असून कर्नाटकासह दक्षिण महाराष्ट्रात मोसमी वारे सक्रीय झाले आहेत. दोन दिवसांनी कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता असून सिंधुदूर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात आज ३१ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
पुढील ५ दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती असून मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र व कोकणातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असून सामान्य तापमानाच्या तुलनेत कमी तापमान नोंदवले जात आहे. पुढील पाच दिवसात तापमानात ३ ते ४ अंशांची घट होऊ शकते, असे हवामान विभागाने सांगितले.