राज्यात काही ठिकाणी सततचा पाऊस सुरु आहे आणि यात पिकांवर त्याचे विपरीत परिणाम होताना दिसत आहेत. पाने पिवळी पडणे, तणांचा प्रादुर्भाव तसेच कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतो आहे, यासाठी उपाययोजना म्हणून विस्तार शिक्षण संचालनालय व.ना.म.कृ.वि. परभणी अंतर्गत विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, लातूर यांनी सोयाबीण आणि तूर पिकासाठी सल्ला दिला आहे.
राज्यात मागील दहा दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे सोयाबीनचे पिक पिवळे पडले आहे. सोबतच तणांचा प्रादुर्भाव वाढत असून आंतरमशागतीच्या कामांना बाधा निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी.
- शेतात साचलेला पाण्याचा निचरा करणे
चराद्वारे शेतामध्ये साचलेले पाणी शेताबाहेर काढून देणे.
वापसा येताच बळीराम नांगराने चार ओळीनंतर सरी पाडून घ्यावी जेणेकरून यापुढील काळात शेतात रिक्त पाणी साचून राहणार नाही.
- अन्नद्रव्ये व्यवस्थापन
मागील काही दिवसात होत असलेल्या संततधार पावसामुळे जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण कमी झाले आहे.
(Leaching losses) त्यासोबतच जमिनी वापस्यावर येत नसल्यामुळे पिक जमिनीतील अन्नद्रव्ये घेऊ शकत नाहीत यामुळेच सोयाबीनचे पिक पिवळे पडले आहे.
अशा परिस्थितीमध्ये फवारणीद्वारे १९:१९:१९, ५० ग्रॅम + सूक्ष्म मुलद्रव्ये ग्रेड-२५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
- तणांचे व्यवस्थापन
जमिनी वापस्यावर येताच आंतरमशागती द्वारे कोळपणी करून घ्यावी.
आंतरमशागत करणे शक्य नसल्यास पिक एक महिन्याचे असेपर्यंत तणनाशकाच्या मदतीने तणांचा बंदोबस्त करून घ्यावा.
उगवणी पश्चात तणनाशकामध्ये ओडिसी ४० ग्रॅम किंवा परस्युट ४०० मिली २०० लिटर पाण्यातून एक एकर क्षेत्रावर फवारणी घ्यावी.
- किड आणि रोगाचे व्यवस्थापन
सोयाबीन पिक २५ ते ३० दिवसाचे झाले असेल तर किड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम + लॅमडा साह्यलोथ्रीन (अलिका) ०३ मिली किंवा कोराजन ०३ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५०% २० मिली यासोबत साफ (मॅन्कोझेब + कार्बेडाझीम) हे बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.
तूर पिकामध्ये मर रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा २०० मिली प्रति १० लिटर पाण्यात घेऊन ओळीच्या बाजूने ड्रेचींग किंवा आळवणी घ्यावी.
- दुबार पेरणी
ज्याठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे त्यासाठी सोयाबीन + तूर या आंतरपीक पद्धतीचा किंवा सलग तूर पिक किंवा सूर्यफुल या पिकाची निवड करून पेरणी करावी.
प्रा. ए.व्ही. गुट्टे
विस्तार कृषि विद्यावेत्ता, विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, लातूर