पिंपरी : "बैलगाडा शर्यतीत अधिराज्य गाजवणारा सप्तहिंदकेसरी 'मन्या'च आता नाही राहिला... आता शौकिनांनी कुणाची बारी बघायला जायचं..?" असा भावनिक सवाल खेड तालुक्यातील वाफगावात आलेले हजारो बैलगाडाप्रेमी विचारत होते. निमित्त होते, 'मन्या' बैलाच्या दशक्रिया विधीचे.
बैलगाडा शर्यत घाटांचा राजा सप्तहिंदकेसरी 'मन्या' बैलाचे २६ फेब्रुवारीला निधन झाले. बुधवारी त्याचा दशक्रिया विधी पार पडला. यावेळी पुणे, अहमदनगर, साताऱ्यासह विविध जिल्ह्यांतून मन्यावर प्रेम करणारे पाच हजारावर बैलगाडाप्रेमी आणि बैलगाडामालक आले होते. त्यांनी मन्याला श्रद्धांजली वाहिली.
खेड तालुक्यातील वाफगावचे रहिवासी आणि खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेश जवळेकर यांचा मन्या बैल राज्यभरात नावाजलेला होता. २००६ मध्ये मन्या तीन वर्षांचा असताना त्यांनी त्याला विकत घेतले. म्हैसूर जातीचा मन्या रंगाने जांभळट कोसा होता. शरीरावर काळ्या रंगांच्या छटा. कान लांबट टोकदार, आतून पिवळसर. पाय उंच, सरळ. शिंगे कपाळमाथ्याजवळ एकदम लागून. चिंचकोळी तर डौलदार, आखीव-रेखीव. स्वभाव कमी तापट असल्याने चिमुरडीही त्याच्याजवळ बिनघोर जात.
राजू जवळेकर यांचे बंधू बाळासाहेब मन्याला पोटच्या लेकराप्रमाणे जपत, आलिशान बंगला असताना केवळ त्याच्यासाठी ते दिवसरात्र गोठ्यात राहायचे. त्याला दूध, अंडा, शेगपड हाताने खाऊ घालत. रात्री कितीही उशिरा आले तरी ते त्याला हाताने खायला घालायचे. मन्याचे जुपणीबहाद्दर माणिक सांडभोर यांचाही त्याच्यावर भारी जीव. त्यांनी इशारा करताच तो भिर्रर्र पळायचा आणि शर्यतीची बारी जिंकायचाच. तो तब्बल सात वेळा हिंदकेसरी झाला.
जवळेकर यांच्या भगिनी सुवर्णा मिसाळ सांगतात, "आमच्या भावाला लहानपणापासून बैलगाडा शर्यतीची खूप आवड. लहानपणी शाळेला दांडी मारून बैलगाडा शर्यत बघायला जायचा. नंतर त्याला पैलवान करायचा म्हणून तालमीत पाठवले. त्याने पैलवान होऊन महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी बनावे, ही आमची इच्छा होती. पण ती पूर्ण झाली नाही. ती इच्छा मन्याने पूर्ण केली."
तब्बल दीडशे दुचाकी, ६० बुलेट, ट्रॅक्टर, बोलेरो, थार, स्कॉर्पिओ
मन्या तीन वर्षांचा असतानाच २००६ मध्ये त्याला पहिल्यांदा गाड्याला जुंपण्यात आले. तो २१ वर्षांचा असताना २० फेब्रुवारीला खेड तालुक्यातील 'राजगुरूनगर केसरी' शर्यतीसाठी अखेरच्या बारीत उतरला. तेथेही घाटाचा राजा झाला. १८ वर्षांत अनेक विक्रम केले.
वडगाव कांदळीचा घाट १२ सेकंदाचा होता पण मन्याने १०.८७ सेकंदात बारी आणली. माण- मुळशीची बारी १०.३५ सेकंदात आणली. त्याने १५० दुचाकी, ६० बुलेट, २ ट्रॅक्टर, २ बोलेरो, १ थार, १ स्कॉर्पिओ आणि लाखो रुपयांच्या इनामांवर मोहोर उमटवली.
मन्याची जोड कोणासोबतही जमायची...
मन्याची सुरुवातीला जोड घरच्याच हरण्या, रायबा बैलांबरोबर होती. नंतर अप्पासाहेब साकोरेंचा बंट्या, वरपे मामांचा हिरा, संदीप शेठ भोकसेंचा बलमा, संतोष मांडेकरांचा हरण्या आणि भानुदास लांडगे यांच्या काशी या बैलांबरोबर जुगलबंदी असायची. चिखलीत मन्या आणि बंट्या यांनी १२.२ सेकंदांत आतून बारी आणून विक्रम केला.