आनंदा सुतार
वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात जून महिन्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस बरसला, पण जुलै महिन्याच्या सुरुवातीसच पावसाची रिपरिप पुन्हा सुरु असतानाच या परिसरात मागील दोन दिवसापासून अतिवृष्टी झाल्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या चिखलणी व भात रोप लावणीची लगबग सुरु झाली आहे.
शेत शिवारात सर्जा राजाला दिलेला आवाज घुमू लागला आहे शेती कामामुळे शेत शिवार सध्या माणसांच्या गर्दीने फुलून गेला आहे. शिराळा तालुक्यातील खुंदलापुर, मणदूर, मिरुखेवाडी, सोनवडे, आरळा, खोतवाडी पाजगणी, टेटमेवाडी, शाहूवाडी तालुक्यातील उखळू, भिसेवाडी, शित्तूर, शिराळे वारुण, जांबूर व परिसरामध्ये भात शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते.
उंच सखल, डोंगर-पठारावर असणाऱ्या शेतामध्ये वाड्यावस्तीवरील बळीराजा भर पावसात चिखलणी करुन भात रोपे लावणीच्या कामात व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे.
भात रोपे लावणीसाठी पावसाचे पाणी शेतात आणून बैलांच्या तर काही ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने नांगरणी केली जाते व फावड्याच्या साहाय्याने रोप लावणीसाठी निवडलेल्या वाफ्यामध्ये समपातळीत चिखल करून रोप लावण केली जाते.
लावणीसाठी लागणारी भातांची रोपे (तरु) काढण्यासाठी महिला पहाटेच शेतात जात आहेत. पावसाने देखील चांगली साथ दिल्याने रोप लावणीस वेग आला आहे. काही ठिकाणी मजुरीवर तर काही ठिकाणी पैरा पद्धतीने रोप लावण केली जात आहे. तर काही ठिकाणी वरी, नाचणी ही लावली जात आहे.
एकीकडे धुळवाफेच्या भाताची उगवण चांगली झाली असून उगवलेल्या भाताच्या भांगलणीची कामे सुरु आहेत. तर दुसरीकडे चिखलणी पद्धतीने भाताची रोपे लावण्याची कामे ही सुरू असल्याने एकूणच शिराळा पश्चिम व शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकरी वर्ग भाताच्या रोप लावणीत मग्न असल्याचे दिसून येत आहे.
बैलांसह यंत्राचाही वापर
शिराळा तालुक्यातील सुंदलापूर, मणदूर, मिरुखेवाडी, सोनवडे, आरळा, खोतवाडी पाजगणी, टेटमेवाडी, शाहूवाडी तालुक्यातील उखळू, भिसेवाडी, शित्तूर, शिराळे वारुण, जांबूर व परिसरामध्ये भात शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते. भात रोपे लावणीसाठी पावसाचे पाणी शेतात आणून बैलांच्या तर काही ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने नांगरणी केली जाते व फावड्याच्या साहाय्याने रोप लावणीसाठी निवडलेल्या वाफ्यामध्ये समपातळीत चिखल करुन रोप लावण केली जाते.
शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग हा पावसाचे आगर म्हणून संबोधला जातो यंदा मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाने काही दमदार हजेरी लावली नव्हती. अखेर गेल्या चार दिवसांपासून या परिसरामध्ये पावसाचे दमदार आगमन झाल्याने चिंतातूर झालेल्या शेतकरी वर्गास काहीसा दिलासा मिळाला आहे. - सखाराम पाटील, मणदूर शेतकरी
अधिक वाचा: जादा पावसात तग धरणारे हे तेलबिया पीक घ्या आणि मिळवा अधिकचा नफा