विकास शहा
शिराळा : गेल्या काही वर्षात शिराळा तालुक्यात प्रामुख्याने वारणा काठावरील युवा शेतकरी नोकरीच्या मागे न लागता शेतीत नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत.
बिऊर (ता. शिराळा) हे नेहमीच दुग्ध व्यवसायात आघाडीवर असलेले गाव. येथील अमृत अशोक खुजे या युवा शेतकऱ्याने जातवान गाईंचा मुक्त गोठा करून अवघ्या चार वर्षात दुग्ध व्यवसायातून प्रगती साधली आहे.
सुरुवातीच्या काळात अमृत यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती करत किराणा मालाचे दुकान सुरू केले. यामध्ये घरखर्चाला आधार मिळायला लागला. पुढे जोडधंदा म्हणून गाईपालनास सुरुवात केली.
सुरुवातीला दोन गाई होत्या. पुढे गोठा वाढवत नेला. सध्या त्याच्याकडे २५ मोठ्या गाई व २० कालवडी आहेत. दररोज २५० ते ३०० लिटरपर्यंत दूध संकलन होते. घरची अडीच एकर पानस्थळ शेती आहे.
त्यामध्ये त्यांनी गाईंसाठी लागणाऱ्या चाऱ्याचे उत्पादन घेण्यावर भर दिला. २००९ पासून अमृत यांनी गोपालनाची सुरुवात केली. २०२१ मध्ये गाईंसाठी १० गुंठे क्षेत्रावर मुक्तसंचार पद्धतीच्या गोठ्याची उभारणी केली.
गोठ्यातील कामाला रोज पहाटे ४ वाजता सुरुवात होते. यंत्राच्या मदतीने दूध काढल्यानंतर गाईंना चारा व खुराक दिला जातो. दिवसभर गाई मुक्त संचार गोठ्यामध्ये असतात. सायंकाळी पुन्हा दूध काढणी करुन चारा व खुराक दिला जातो.
अधिक वाचा: Milk Fat : दुधाला फॅट कमी का लागते? वाढविण्यासाठी हे करा सोपे उपाय