महाराष्ट्रात मागील चार ते पाच वर्षांपासून अमेरिकन लष्करी अळी (फॉल आर्मीवर्म) शास्त्रीय नाव स्पोडोप्टेरा फुगीपर्डा हि कीड मका पिकावर सतत मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करतांना आढळते आहे.
सदर कीड बहुभक्षी असून ८० पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजिविका करते. परिणामी सर्वच हंगामामध्ये किडीसाठी यजमान वनस्पती सहजपणे उपलब्ध होतात.
ही कीड मका, मधुमका, ज्वारी, बाजरी, भात ही तृणधान्य पिके तसेच कापूस, सोयाबीन, ऊस या पिकांना देखील मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करते त्यामुळे वेळीच तिचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.
प्रादुर्भाव वाढण्याची कारणे
१) प्रवास क्षमता
या किडीचा पतंग एका रात्रीत सुमारे १०० कि.मी. पर्यंत तर वाऱ्याचा वेग अनुकूल राहिल्यास ३० तासात १६०० कि.मी. पर्यंत गेल्याची नोंद आहे. यामुळे दुर्गम भागातील मका पिक शोधून तिथेही सहजपणे अंडी घालू शकत असल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यात मका पिकावर या किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.
२) उच्च प्रजनन दर
या किडीचे जीवनचक्र वर्षभर चालू असते. सदर किडीची प्रजनन क्षमता प्रचंड असून मादी तिच्या जीवनक्रमात सुमारे एक ते दोन हजार अंडी घालते व त्यामुळे अल्पावधीतच किडीच्या संख्येत प्रचंड वाढ होते.
सद्य स्थितीत पिक अवस्थेनुरूप करावयाचे व्यवस्थापन
१) पिकाचे आठवड्यातून किमान दोनवेळा नियमित सर्वेक्षण केल्यास वेळीच अळीचा प्रादूर्भाव ओळखणे शक्य होते.
२) कामगंध सापळ्यांचा वापर मक्यावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी ५ कामगंध सापळे वापरावेत. या कामगंध सापळ्यांमध्ये ३ पतंग प्रती सापळा आढळून आल्यास ट्रायकोग्रामा प्रीटीओसम किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवग्रस्त केलेली ५०,००० अंडी प्रती एकर या प्रमाणात एक आठवड्याच्या अंतराने ३ वेळा शेतात प्रसारण करावे.
३) प्रकाश सापळ्यांचा वापर किडीचे पतंग मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यास, प्रकाश सापळ्यांचा वापर करून पतंग पकडावेत व रॉकेल मिश्रित पाण्यात बुडवून मारावेत.
४) किडीचे अंडीपुंज व जास्तीत जास्त अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
५) किडीचे पर्यायी खाद्य तणे जसे हराळी (सायनोडॉन डॅक्टीलॉन), सिंगाडा (बकव्हीट), डिजीटेरीया प्रजाती (कॅबग्रास) इ. वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
६) पिकाची काढणी लवकर करावी त्यामुळे नंतरच्या हंगामातील किडीच्या प्रादुर्भावातून सुटका होईल.
७) प्रत्यक्ष शेताचे निरीक्षण करतांना शेतात नागमोडी किंवा इंग्रजी W अक्षरासारखे फिरून पाच ठिकाणे व २० झाडे किंवा दहा ठिकाणे व १० झाडे निवडावीत. समजा २० झाडांपैकी २ झाडे प्रादुर्भावीत असतील तर नुकसान पातळी १० टक्के आहे असे समजावे व अर्थिक नुकसान संकेत पातळी लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात.
आर्थिक नुकसान पातळी
पिकाची अवस्था व कालावधी | उपाययोजना करावयाची पातळी |
मध्यम पोंग्यांची अवस्था (उगवणीनंतर ५ ते ६ आठवडे) | १० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे |
शेवटची पोग्यांची (उगवणीनंतर ७ आठवडे) अवस्था | २० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे |
तुऱ्याची अवस्था व त्यानंतर (८आठवड्यानंतर) | फवारणी टाळावी पण १० टक्के प्रादुर्भावग्रस्त कणसे असल्यास फवारणी करावी. |
मका हे मुखत्वे चारा पिक म्हणून घेतले जात असल्याने रासायनिक किटकनाशकांची फवारणी करणे टाळावे. किडीचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन फवारणीसाठी खालील जैविक घटकांचा वापर करावा.
वनस्पती/सूक्ष्मजीवजन्य कीटकनाशक | मात्रा प्रती १० लिटर पाणी |
निंबोळी अर्क ५% | १ लिटर |
अॅझाडीरेक्टीन १५०० पी पी एम | ५० मिली |
बॅसिलस थुरीनजिएन्सीस कुर्सटाकी प्रजाती | २० ग्रॅम |
मेटरिझीयम अॅनीसोप्ली | ५० ग्रॅम |
मेटरिझीयम रिलाय (नोमुरीया रिलाय) | ५० ग्रॅम |
विव्हेरीया बासिॲना | ५० ग्रॅम |
लेकॅनिसिलीयम लेकॅनी | ५० ग्रॅम |
वरील वनस्पती/सूक्ष्मजीवजन्य कीटकनाशक संबंधित आपल्या जवळील कृषी विज्ञान विज्ञान केंद्राशी संपर्क करून त्याची उपलब्धता आणि प्रमाण याविषयी माहिती घ्यावी. तसेच संध्याकाळच्या वेळेस जैविक घटकांची फवारणी पोंग्यामध्ये द्रावण जाईल अशा पद्धतीने करावी. त्यानंतर गरज भासल्यास १० दिवसांच्या अंतराने १ ते २ फवारण्या कराव्यात.