सोयाबीन हे एकविसाव्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय तेलबिया पीक असून पिकाखालील क्षेत्राचा विचार करता महाराष्ट्राचा मध्यप्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो. सोयाबीन हे विदर्भातील अतिशय महत्त्वाचे पीक असून दरवर्षी या पिकाखाली महाराष्ट्रात एकूण ४८ ते ५० लाख हेक्टर आणि विदर्भात एकूण १७-१८ लाख हेक्टर क्षेत्र असते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती हे महाराष्ट्रातील मुख्य सोयाबीन संशोधन केंद्र आहे. या सोयाबीन केंद्राद्वारे आतापर्यंत ६ वाण प्रसारीत करण्यात आले असून २६ संशोधनात्मक शिफारशी प्रसारीत केल्या आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने सोयाबीनचे नवीन चार वाण प्रसारीत केले आहेत.
१) पिडीकेव्ही अंबा (एएमएस १००-३९) हे वाण लवकर परिपक्त होणारे, जास्त उत्पादन क्षमता असलेले, तीन दाण्यांच्या शेंगांचे प्रमाण व दाण्यांचे वजन इतर वाणांपेक्षा जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात लोकप्रिय होत आहे. या वाणात तेल व प्रथिनांचे प्रमाण सुध्दा इतर वाणांपेक्षा जास्त आहे. सदर वाण हा बदलत्या हवामानात तग धरणारा वाण आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय प्रात्याक्षिका मध्ये सदर वाणाने प्रचलित वाणांपेक्षा २७% जास्त उत्पादकता नोंदविली आहे.- राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यांकरीता प्रसारीत.- प्रसारण वर्षः २०२१, अधिसूचना वर्ष २०२१.- जास्त उत्पादन क्षमता (सरासरी उत्पादकताः २८-३० क्विं./हे)- लवकर परिपक्व होणारे वाण (९४-९६ दिवस)- मुळकुज/खोडकुज या रोगास व चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक.- प्रचलित वाणांपेक्षा तेलाचे व प्रथिणाचे प्रमाण तुलनात्मक दृष्टया जास्त.- परीपक्तेनंतर १०-१२ दिवसापर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक.
२) सुवर्ण सोया (एएमएस एमबी ५-१८) या वाणाची अखिल भारतीय स्तरावर मुळकुज/खोडकुज या रोगास प्रतिकारक्षम स्त्रोत म्हणून ओळख असल्यामुळे हे वाण ज्या भागात जमिनीत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव/प्रसार जास्त आहे, त्या भागात लागवडीस उपयुक्त असे ठरते. तसेच शेंगा व झाडावर लव असल्यामुळे येणाऱ्या किडीस प्रतिरोध करते. शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषिय प्रात्याक्षिकामध्ये सदर वाणाने प्रचलीत वाणांपेक्षा २२% जास्त उत्पादकता नोंदविली आहे. इतर वाणांपेक्षा शेंगांची जास्त संख्या व मुळकुज/खोडकुज या रोगास प्रतिकारकते मुळे सदर वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.- राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यांकरीता प्रसारीत.- प्रसारण वर्षः २०१९, अधिसूचना वर्ष २०२१.- फुलाचा रंग पांढरा असुन खोड व शेंगावर तपकिरी रंगाची लव आहे.- परिपक्तेचा कालावधी: ९८-१०२ दिवस.- सरासरी उत्पादकता: २४-२८ क्विंटल/हेक्टर.- मुळकुज/खोडकुज व पानावरील बुरशीजन्य ठिपके या रोगांस प्रतिकारक.- चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक.- परीपक्तेनंतर १०-१२ दिवसापर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक.
३) पिडीकेव्ही येलो गोल्ड (एएमएस १००१)हे वाण मध्यम कालावधीत येणारे असून निश्चित ते मध्यम पर्जन्यमानाच्या भागात उत्तम निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत लागवड केल्यास प्रचलित वाणांपेक्षा हमखास जास्त उत्पादन देते. विशेष करून बुलढाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यामध्ये या वाणाला चांगली मागणी आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय प्रात्याक्षिकामध्ये सदर वाणाने प्रचलित वाणांपेक्षा २०% जास्त उत्पादकता नोंदविली आहे.- प्रसारण वर्ष: २०१८ (महाराष्ट्रासाठी प्रसारित)- अधिसूचना वर्ष २०१९.- फुलाचा रंग जांभळा असुन खोड व शेंगावर लव नाही.- परिपक्तेचा कालावधीः ९५-१०० दिवस.- सरासरी उत्पादकता २२-२६ क्विंटल/हेक्टर.- मुळकुज/खोडकुज व पिवळा मोझेंक या रोगांस मध्यम प्रतिकारक.- चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक.- परीपक्तेनंतर १० दिवसापर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक.
४) पिडीकेव्ही पुर्वा (एएमएस २०१४-१)सदर वाण पूर्व भारतातील राज्यांसाठी प्रसारित करण्यात आले असून जास्त पर्जन्यमानाच्या भागात लागवडीस उपयुक्त ठरते. या वाणाची पूर्व विदर्भातील जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी पिक/बिजोत्पादन प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत.- राष्ट्रीय स्तरावर छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओरिसा व पश्चिम बंगाल या राज्यांकरीता प्रसारीत- प्रसारण वर्षः २०२०, अधिसूचना वर्ष २०२१.- फुलाचा रंग जांभळा असुन खोड व शेंगावर लव नाही.- परिपक्तेचा कालावधीः १०२-१०५ दिवस.- सरासरी उत्पादकता २२-२६ क्विंटल/हेक्टर.- पिवळा मोझॅक या रोगांस प्रतिकारक.- चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक.- परीपक्तेनंतर १० दिवसापर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक.
अधिक वाचा: Maka Lagavd मका लागवड करताय? लवकर पक्व होणारे वाण कोणते