ऊसाची लागवड दोन डोळा टिपरी, एक डोळा टिपरी आणि रोपांपासून केली जाते. सद्यस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी कमी खर्चामध्ये एक डोळा टिपरीच्या रोपांपासून लागवड करीत आहेत. महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षात ऊस रोपांची लागवड करणे फायदेशीर दिसून येत आहे.
सध्या शेतकरी नर्सरीमधून ऊस रोपे घेवून ऊसाची लागवड करीत आहेत. परंतु नर्सरीतील रोपांची किंमत अधिक आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात एक डोळा टिपरीपासून रोपे बनविणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची उत्पादकता वाढविण्याकरीता नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे आहे.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे व टिकविणे, शुध्द बियाण्याचा वापर, रूंद सरी लागवड पध्दत, रोप लागवड तंत्रज्ञान, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, संजीवकांचा वापर, तण व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन या आधुनिक तंत्राचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
एक डोळा टिपरीने रोपे निर्मिती करणे गरजेचे आहे. जेणेकरून कमी खर्चात रोपांची निर्मिती करून उत्पादकता वाढीस मदत होईल.
फुले सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान
१) ऊसाची एक डोळा टिपरी तयार करावी.
२) बेणे प्रक्रिया करावी (१ लिटर पाण्यात १ ग्रॅम कार्बेन्डाझीम + ३ मिली मॅलॅथिऑन त्यानंतर १ लिटर पाण्यात १०० ग्रॅम अॅसेटोबॅक्टर + १२.५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू)
३) शेतकऱ्याने शेतावर गादी वाफा तयार करावा.
४) गादी वाफ्यावर रिकामी खताची पोती/प्लॅस्टीक कागद पसरावा.
५) पोत्यावर/प्लॅस्टिक कागदावर उगवणी माध्यम समप्रमाणात टाकावे.
६) ऊसाची एक डोळा टिपरी पोत्यावर/प्लॅस्टिक कागदावर ठेवावीत गादीवाफ्याला पुरेसे पाणी द्यावे.
७) गादीवाफा ऊसाच्या पाचटाने आणि काळ्या प्लॅस्टिक कागदाने सात दिवस झाकावा.
८) सात दिवसानंतर पाचट आणि काळा प्लॅस्टिक कागद काढावा.
९) सात दिवसानंतर दररोज रोपांना झारीने/सुक्ष्म तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
१०) २५ दिवसांनी ऊसाची रोपे लागवडीस तयार होतात.