Join us

मराठवाड्यातला तरुण शेतकरी ड्रोनच्या वापरातून करतोय रोजगारनिर्मिती

By पंकज प्रकाश जोशी | Published: August 14, 2023 3:22 PM

पैठण तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी दामोदर खेडकर हे ड्रोनच्या वापरातून रोजगारनिर्मितीही करत आहेत.

स्वत:च्या शेतीत ड्रोनसारख्या आधुनिक तंत्राचा वापर करायलाच पाहिजे, पण या तंत्राचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांनाही झाला आणि त्यातून रोजगार निर्मिती झाली, तर अधिक चांगले. नेमका हाच विचार करून मराठवाड्यातील एका तरुण शेतकऱ्याने अत्याधुनिक ड्रोनची खरेदी केली आणि त्यातून ते स्वत:बरोबरच इतरांनाही रोजगार देत आहेतच शिवाय मराठवाड्याचे शेतकरीही आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात मागे नाहीत हेही आपल्या कृतीतून दाखवून देत आहेत.

अशी मिळवली माहिती

दामोदर खेडकर असे या प्रयोगशील तरुण शेतकऱ्याचे नाव असून पैठण तालुक्यातील चांगतपुरी या गावाचे ते रहिवासी आहेत. ऊसासह विविध पिके ते आपल्या शेतात घेतात. त्यांना नव्या तंत्रज्ञानाची आवड असल्याने विविध प्रयोग ते शेतात करत असतात. याच नव्या तंत्राच्या ध्यासातून त्यांना ड्रोन बद्दल सोशल मीडिया व इंटरनेट वरून अधिक माहिती मिळवत नागपूरच्या एका एजन्सीशी संपर्क साधला आणि सुमारे पावणे पाच लाख रुपयांचे ड्रोन विकत घेतले. सोबत दोन बॅटरीही अधिकच्या विकत घेतल्या. एका बॅटरी चार्जमध्ये ड्रोनद्वारे एक एकर फवारणी सहज होते असे श्री. खेडकर गणित मांडतात. त्यामुळे जेव्हा जास्त क्षेत्र फवारणी करायचे असते, तेव्हा दोन-तीन बॅटरी हाताशी असाव्यात म्हणून त्यांनी दोन अधिकच्या बॅटरीही प्रत्येकी सुमारे ६५ हजार रुपये मोजून विकत घेतल्या आहेत.

असा होतोय उपयोग

‘ऊसाच्या शेतीसाठी कीटकनाशक, औषध फवारणीसाठी ड्रोनचा खूपच उपयोग आहे. याआधी ऊसात पावडर मारणे तसे अवघडच जायचे, ड्रोनमुळं हे काम केवळ १०-१५ मिनिटांत होतं बघा..’ श्री. खेडकर उत्साहानं सांगतात. ‘आता कपाशी लहान आहे, त्यामुळं पाठीवर पंप घेऊन कपाशीत फवारणी करता येते, पण थोडी मोठी झाल्यावर काय काय अडचणी येतात, ते शेतकऱ्यांनाच माहीत. वाढलेल्या कापसात घुसून फवारणी करणं  खूप अवघड काम, त्यात साप-विंचवांचाही धोका असतोच, पण बरेचदा शेतकऱ्याला तो पत्करून फवारणी करावी लागते.’ श्री. खेडकर अस्सल मातीतला अनुभवच आपल्यापुढं मांडतात. ड्रोन वापरताना एका एकरसाठी १० ते १२ लिटर पाण्याची आवश्यकता असते. कोणत्याही वेळेस फवारणी करता येते.

जीवाचा धोकाही झाला कमी

मध्यंतरी विदर्भात कपाशीच्या फवारण्या अधिक वेळा कराव्या लागल्या. त्यातून विषबाधा होऊन अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता. याचे कारण म्हणजे पाठीवरचा फवारणी पंप व त्यातील जहाल किटकनाशक. एरवीही फवारणी करताना शेतकऱ्यांना कीटकनाशकामुळे विषबाधा होण्याचा धोका असतोच. अनेकदा तर असे अंश पोटात जाऊन दीर्घकालीन आजारही होतात. या सर्वांसाठी मजूरांचीही समस्या आहे, ती वेगळीच. पण ड्रोनमुळे या समस्या येत नाही. आपण दूरवरून फवारणी करू शकतो. त्यामुळे औषध श्वासात जाण्याचा धोका अगदीच नगण्य म्हटला तरी चालतो. शिवाय मजूर टंचाईवरही उपाय झाला.

वेळेची बचत आणि रोजगाराची निर्मिती

एक एकर फवारणी करण्यासाठी ड्रोनला अवघे १५ मिनिटे वेळ लागतो. सध्या फवारणीसाठी मजूरांचा दर एकरी ५०० रुपये आहे. साधारणत: त्याच दरात म्हणजेच ५०० ते ६०० रुपये प्रती एकर याप्रमाणे श्री. खेडकर हे आपल्याजवळील ड्रोनच्या साह्याने इतरांचीही शेतं फवारून देत आहेत. त्यासाठी त्यांनी गावतीलच एक तरुण सोमा होरकटे यांना ड्रोन चालविण्याचे ट्रेनिंगही थेट कंपनीच्या माध्यमातून दिले आहे. त्यात त्यांना कौशल्य आले की एकरी शंभर रुपये या हिशेबाने या तरुणालाही ‘ड्रोन पायलट’ म्हणून रोजगार मिळेल. 

सध्या आम्ही ऊस, कापूस, मोसंबी, सोयाबीन अशा पिकांवर फवारणी करून देत आहोत. शेतकऱ्यांची जशी आवश्यकता असेल, तशी आम्ही फवारणी करतो. ड्रोनमुळे फवारणी अवघ्या काही मिनिटांवर आली असून घरच्या शेतीसोबतच परिसरातील शेतकरीही त्याचा लाभ घेत आहेत, ही माझ्यादृष्टीने समाधानाची बाब आहे.- दामोधर खेडकर, प्रयोगशील शेतकरी, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर 

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणशेतीशेतकरी