संजय पाटीलकऱ्हाड : 'वावर हाय तर पावर हाय' असं म्हणतात; पण सध्या शेतकऱ्यांकडे शेतीक्षेत्रच गुंठ्यात राहिलंय. त्यामुळे कसं भागवायचं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहतोय. कऱ्हाड तालुक्यात १ लाख २० हजार एकूण शेतकऱ्यांपैकी तब्बल ९४ हजार शेतकरी अत्यल्पभूधारक या वर्गवारीत पोहोचलेत.
कालांतराने उपलब्ध जमिनीचेही तुकडे पडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे तोकडीच जमीन शिल्लक राहण्याची चिन्हे आहेत. एकाच घरात कुटुंबांची संख्या वाढली. दोनाचे चार आणि चाराचे सहा झाले. मिळकतीत वारसदार उभे राहिले; पण हक्कदार वाढले असले तरी वडिलोपार्जित जमीन तेवढीच राहिली.
परिणामी, एकरातील शेती आता गुंठ्यात आली असून पूर्वीची जमीनदार कुटुंबे आता एकर अथवा अर्ध्या एकरावरच पोट भरीत आहेत. कऱ्हाडसारख्या सधन तालुक्यात कौटुंबिक वाटण्यांमुळे गत काही वर्षांमध्ये शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर तुकडे पडले आहेत.
त्यामुळे अत्यल्प आणि अल्पभूधारकांची संख्या वाढली असून, कृषिगणना २०१५-१६ नुसार तालुक्यातील तब्बल ९४ हजार २३६ शेतकऱ्यांची शासनदरबारी अत्यल्पभूधारक म्हणून नोंद आहे; तर अल्पभूधारकांची संख्या १७ हजारांपेक्षाही जास्त आहे.
अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपैकी काहीजण सध्या दुसऱ्याच्या बांधावर अथवा शहरात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत आहेत. कुटुंबात सदस्यसंख्या जास्त आणि शेतीक्षेत्र कमी असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना कुटुंबातील सदस्यांचा वाढलेल्या गरजा कशा भागवायच्या, हा प्रश्न पडत आहे.
अत्यल्प, अल्पभूधारक म्हणजे..• अत्यल्पभूधारक : एक हेक्टर म्हणजेच अडीच एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी.• अल्पभूधारक : दोन हेक्टर म्हणजेच पाच एकरांपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी.• जमीनदार : पाच एकरांपेक्षा जास्त क्षेत्र असलेले सर्व शेतकरी.
शेतीच्या तुकड्यांमुळे अनेक प्रश्न• तुकडे पडलेल्या शेतीची मशागत करता येत नाही.• विहीर, बोअरची अशी पाण्याची सोय नसते.• विकत पाणी घेऊन शेती पिकवावी लागते.• विकतचं पाणी, खते, बी-बियाणे यांसह उत्पादनखर्च वजा जाता किरकोळ नफा उरतो.
शेतजमीन विकतही मिळेनाशेती हा शेतकरी कुटुंबाचा पाया असतो. अगदी विवाहाच्या चौकशीतही शेतीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आपल्याकडे शेतीक्षेत्र जास्त असावे, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. काहीजण शेती खरेदीसाठी इच्छुकही आहेत. मात्र, विकतही शेतजमीन मिळत नसल्याची परिस्थिती कऱ्हाड तालुक्यात असून बागायत शेतजमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार गत काही वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहेत.
अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या बांधावर ह्या बहुपयोगी वनस्पतीचे एक तरी झाड असायला हवं