गेल्या काही महिन्यांपासून अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जात आहे. "एआय" तंत्र कृषी क्षेत्रात वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. "एआय" तंत्राच्या मदतीने शेतीला समृद्ध करण्याचा नवा मार्ग शेतकऱ्यांना सापडणार आहे. शेतात उत्पादित मालाचा योग्य दर मिळेल याचा बाजारपेठ अंदाज कळणार आहे. या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेती अधिक उत्पादनशील, शाश्वत आणि नफा देणारी करता येणार असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांकडूनही केला जात आहे.
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने 'एआय' चा वापर करण्यासाठीच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. त्यानुसार शेतक-यांना आता प्रगत तंत्राज्ञानाच्या मदतीने शेती करता येणार आहे.
हवामान बदलाची पूर्वकल्पना मिळणार
सतत बदलणाऱ्या हवामानाच्या प्रभावामुळे शेतीत अनिश्चितता वाढली असून, "एआय" आधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पिकांची स्थिती आणि संभाव्य संकटांबाबत पूर्वकल्पना मिळणार आहे. यामध्ये "एआय" मॉडेल्स जुना डेटा आणि वर्तमान स्थितीचा हवामान वापर करून अचूक अंदाज मिळणार आहे.
मजुरांची समस्या होणार दूर
कृषी रोबोटिक्स आणि एआय तंत्रज्ञानामुळे मजुरांची समस्या, निविष्ठांच्या वाढत्या किमतीची अडचण यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे.
शेतीची प्रभावी पद्धत
"एआय" सक्षम रोबोट्स हा तण नियंत्रण, पीक संरक्षण, कापणी इत्यादी अधिक वेगाने आणि अचूकपणे करू शकत असल्याने स्मार्ट उपकरणांचा वापर करून शेतकरी अधिक प्रभावी शेती पद्धती आणि तंत्रज्ञान शिकू शकणार आहे.
माती आरोग्य निरीक्षण
मातीतील पोषण तत्त्वाचा अचूक अंदाज घेता येत असून, रोग आणि कीटकांच्या आक्रमणाची आगावू माहिती मिळून योग्य वेळेवर उपाय- योजना करता येणार आहेत.
बियाणे पेरणी व खते टाकणार
"एआय" स्वायत्त ट्रॅक्टर हे ट्रॅक्टर एआय अल्गोरिदम आणि जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे मानवी ऑपरेटरशिवाय बियाणे पेरणी व खते शेतात टाकून देण्यासह पिकांची कापणी करून देणार आहे.
पुरवठा साखळी ऑप्टिमायझेशन
"एआय" अल्गोरिदम जमिनीतील आर्द्रता, तापमान आणि पोषक पातळींवरील रीअल-टाइम डेटा गोळा करता येणार असल्याने शेतकऱ्यांना डेटा-आधारित निर्णय घेता येणार आहे. यामुळे अचूक शेती करता येणार आहे.
कीड नियंत्रण
"एआय"मधील मशीन लर्निंगमुळे ड्रोनच्या मदतीने कीडरोग नियंत्रण आणि हवामान अंदाज याबाबत माहिती मिळवता येणार असून, कमी वेळेत व कमी श्रमात अधिक क्षेत्रावर औषध फवारणी करून कीड तसेच टोळधाड रोखता येणार आहे.
उपग्रह प्रतिमांची मदत मिळणार
उपग्रह प्रतिमांच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता शेतकऱ्यांना हवामान बदलांचा अंदाज देऊ शकते, ज्यामुळे पीक नियोजन करण्यास सुलभ होणार आहे. माती आणि पाण्याची तपासणी करून योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येणार आहे.
- डॉ. सुरेंद्र काळबांडे, अपांरपरिक ऊर्जा स्त्रोत व इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग विभागप्रमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ