आंब्याला मोहोर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी आंबा बागेतील झाडांच्या बुंध्यालगतच्या एक मीटर परिघातील गवत काढून अळ्यातील माती मोकळी करावी.
आंबा बागेतील मोकळ्या जागेमध्ये उथळ अशी नांगरट करावी, बागेची साफसफाई लवकरात लवकर पूर्ण करावी जेणे करुन आंबा बागेतील जमिनीमध्ये असलेले पाण्याचे प्रमाण लवकर कमी होवून झाडाला ताण बसण्यास मदत होईल.
ढगाळ वातावरण व वाढलेली आधता यामुळे आंबा पिकावर तुडतुड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी (पालवी/मोहोर अवस्था १० तुडतुडे प्रती पालवी/मोहोर) ओलांडली असल्यास ज्या बागामध्ये पहिली फवारणी होऊन १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे अशा बागांमध्ये डॉ. बा.सा. को. कृ. विद्यापिठाच्या पालवी व मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार पिकावर दुसरी फवारणी लॅम्बडासायहॅलोथ्रीन ५ टक्के ६ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून घेण्यात यावी.
ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंबा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नियंत्रणासाठी कार्बेनडेझीम १२ टक्के मॅन्कोझेब ६३ टक्के १० ग्राम प्रति १० ली. पाण्यात मिसळून वापरावे.
पालवी लवकर जुन होण्यासाठी व आंब्यास लवकरात लवकर मोहोर धारणा होण्यासाठी ०:५२:३४ या विद्राव्य खताची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात पालवी पोपटी रंगाची असताना (पालवी आल्यानंतर १० ते १५ दिवसांनी) व किमान तापमान कमी झाल्यासच करण्यात यावी (सदरचा सल्ला हा डॉ. बा.सा. को. कृ. विद्यापीठाच्या प्रायोगिक निष्कर्षावर अधारित आहे).