सर्वसाधारणपणे, कोकणातील कृषी हवामानाच्या परिस्थितीत हापूस आंब्याला पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात नवीन पालवी येण्यास सुरवात होते.
काही वेळा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून माघारीला उशीर झाल्यामुळे किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात हंगामी पावसामुळे हापूस आंब्याला पालवी येण्यास विलंब होतो आणि शेवटी पीक उत्पादनात येण्यास विलंब होतो.
हापूस आंब्याचा मोहोर म्हणजेच फुलोरा हा पालवीच्या परीपक्वतेवरती अवलंबून असतो. पालवी येण्यास उशीर झाल्यास पालवीची पक्वता उशिरा होते त्यामुळे मोहोरही विलंबाने येतो.
यामुळे फलधारणेस उशिर होतो. उशिरा पालवी आलेल्या परिस्थितीत कीटक आणि रोगांपासून आंब्यास येणाऱ्या नवीन पालवीचे संरक्षण करणे अनिवार्य आहे.
आंबा मोहोर संरक्षणांचे सुधारित वेळापत्रक
१) पहिली फवारणी (पोपटी रंगाची पालवीवर मोहोर येण्यापूर्वी)
▪️डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही
▪️१० लिटर पाण्यामध्ये औषधाचे प्रमाण : ९ मिली.
▪️या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होते.
२) दुसरी फवारणी (बोंगे फुटताना)
▪️लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के
▪️१० लिटर पाण्यामध्ये औषधाचे प्रमाण : ६ मिली.
▪️या फवारणीमध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने ५ टक्के हेक्झाकोनॅझॉल ५ मिली किंवा पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम १२ टक्के + मॅन्कोझेब ६३ टक्के १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
३) तिसरी फवारणी (दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसाच्या अंतराने)
इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही १० लिटर पाण्यामध्ये औषधाचे प्रमाण : ३ मिली. किंवा बुप्रोफेझिन २५ टक्के प्रवाही १० लिटर पाण्यामध्ये औषधाचे प्रमाण : २० मिली.
४) चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसाच्या अंतराने)
थायमेथॉक्साम २५ टक्के (WDG) १० लिटर पाण्यामध्ये औषधाचे प्रमाण १० ग्रॅम.
५) पाचवी फवारणी (चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसाच्या अंतराने)
डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० लिटर पाण्यामध्ये औषधाचे प्रमाण : १० मिली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के १० लिटर पाण्यामध्ये औषधाचे प्रमाण ६ मिली.
तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ५ टक्के हेक्झाकोनॅझॉल ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे. हेक्झाकोनॅझॉल उपलब्ध नसेल तर पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम १२ टक्के + मॅन्कोझेब ६३ टक्के १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
६) सहावी फवारणी (पाचव्या फवारणीनंतर १५ दिवसाच्या अंतराने)
▪️पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या किटकनाशकापैकी न वापरलेल्या किटकनाशकाची फवारणी करावी.
▪️तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यासच फवारणी करावी.
अधिक वाचा: Madhmashi Palan Yojana : मधुमक्षिकापालकांनो मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करून घ्या अनेक योजनांचा लाभ