Join us

Amba Mohor Sanrakshan : आंबा पिकातील रसशोषक किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कशा घ्याल फवारण्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 11:15 IST

गेल्या पंधरवड्यात हापूस आंब्याला पोषक वातावरण होते. बहुसंख्य झाडांना पालवी फुटली आहे तर पालवी आलेल्या कलमांना मोहोरही आला आहे. मोहोर आलेल्या झाडांना फळधारणा सुरू झाली आहे.

सद्य:स्थितीत आंबा बागेत पालवी व मोहोर अशी संमिश्र स्थिती आहे. फुलोरा मोठ्या प्रमाणात आला असला तरी फळधारणेचे प्रमाण अल्प आहे.  गेल्या पंधरवड्यात हापूस आंब्याला पोषक वातावरण होते.

बहुसंख्य झाडांना पालवी फुटली आहे तर पालवी आलेल्या कलमांना मोहोरही आला आहे. मोहोर आलेल्या झाडांना फळधारणा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत बागेचे कसे नियोजन करायचे ते पाहूया.

तुडतुड्यांचे नियंत्रण▪️ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे आंबा पिकावर तुडतुड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.▪️तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी (पालवी/मोहोर अवस्था - १० तुडतुडे प्रती पालवी/मोहोर) ओलांडली असल्यास कीटकनाशकाची फवारणी करण्यात यावी.▪️यासाठी पोपटी रंगाच्या पालवीवर डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही ९ मि.ली. प्रती १० लिटर पाणी, बोंगे फुटताना लॅम्बडासायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.ली. प्रती १० लिटर पाणी, मोहोर फुलण्यापूर्वीच्या अवस्थेत इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही ३ मि.ली. किंवा▪️ब्युफ्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मि.ली. प्रति १० लिटर पाणी आणि मोहोर फुलल्यानंतर कणी अवस्थेत असताना थायोमेथोक्झाम २५ टक्के दाणेदार १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भुरी रोग नियंत्रण▪️भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ५ टक्के हेक्झाकोनॅझोल ५ मि. ली. किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

करपा रोग नियंत्रण▪️ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंबा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.▪️असे झाल्यास नियंत्रणासाठी कॅर्बेनडेझीम १२ टक्के मेन्कोझेब ६३ टक्के १० ग्राम प्रति १० ली. पाण्यात मिसळून वापरावे.

फुलकीडींचे नियंत्रण▪️फुलकीडीचा प्रादुर्भाव आंब्याच्या मोहोर व फळांवर दिसुन येण्याची शक्यता आहे. ही किड आकाराने सुक्ष्म असल्याने डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही.▪️या किडीचे प्रौढ पिवळे अथवा गडद चॉकलेटी रंगाचे तर पिल्ले पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे असतात.▪️किडीची पिल्ले आणि प्रौढ पाने, मोहोर, कोवळे दांडे आणि फळावरील साल खरवडुन त्यातुन पाझरणारा रस शोषुन आपली उपजीवीका करतात.▪️कोवळ्या सालीचा भाग खरवडल्यामुळे तो भाग काळा पडतो. मोहोर काळा पडुन गळुन पडतो.▪️सदर किडीचा प्रादुर्भाव आढळुन आल्यास नियंत्रणासाठी २.५ मिली स्पिनोसॅड ४५% प्रवाही प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.▪️प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास दुसरी फवारणी थायोमिथॉक्झॉम २५% डब्लु. जी. २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.

महत्वाचे▪️मोहोर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत किटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी.▪️फवारणी करणे गरजेची असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून (सकाळी ०९.०० ते १२.००) फवारणी करावी.▪️किटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी किवा संध्याकाळच्या वेळेस करावी

अन्नद्रव्य व्यवस्थापनपालवी लवकर जुन होण्यासाठी व आंब्यास लवकरात लवकर मोहोर धारणा होण्यासाठी ०:५२:३४ या विद्राव्य खताची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात पालवी पोपटी रंगाची असताना (पालवी आल्यानंतर १० ते १५ दिवसांनी) व किमान तापमान कमी झाल्यासच फवारणी करण्यात यावी. (सदरचा सल्ला हा डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाच्या प्रायोगिक निष्कर्षावर अधारित आहे).

अधिक वाचा: कोकण वगळता इतर १४ जिल्ह्यात आंबा पिकासाठी फळपिक विमा योजना; कशी मिळते नुकसान भरपाई

टॅग्स :आंबाफलोत्पादनफळेकीड व रोग नियंत्रणशेतीशेतकरीकोकणहवामान