Join us

Amba Pik Salla : सद्यस्थितीत तापमानात मोठी वाढ; कशी घ्याल आंबा पिकाची काळजी? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:55 IST

गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढल्यामुळे कैरी वाचविण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू आहे. उष्णतेमुळे आंबा भाजत असून, फळांवर काळे डाग पडले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढल्यामुळे कैरी वाचविण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू आहे. उष्णतेमुळे आंबा भाजत असून, फळांवर काळे डाग पडले आहेत.

ही फळे काही दिवसातच गळून पडतात. गळ मोठ्या प्रमाणात झाल्यास आधीच कमी असलेल्या उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

कसे कराल आंबा पिकाचे व्यवस्थापन?

  • आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येण्याच्या शक्यता आहे. अश्या वेळी बागेमध्ये गळलेली फळे गोळा करुन नष्ट करावीत आणि आंबा फळांचे फळमाशीपासुन संरक्षण करण्यासाठी वि‌द्यापीठाने शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी २ याप्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजुच्या फांद्यावर लावावेत.
  • गेल्या ८ दिवसांपासुन कृषि हवामान वेधशाळेत कमाल तापमानाची नोंद ३७ अंश सेल्सिअस एवढी झालेली आहे. तसेच परिसरात उष्णता लाटे सदृष परिस्थिती असल्याने किनारी भागातील मोठ्या आकाराची साधारणतः अंडाकृती फळे प्रखर सुर्यप्रकाशामुळे भाजुन चट्टे पडत आहेत (सनस्कॅल्ड) तरी आंबा फळांचे प्रखर सुर्यप्रकाशापासुन संरक्षण करण्यासाठी आणि फळांचा आकार व वजन वाढुन डाग विरहीत फळांच्या उत्पादनासाठी फळधारणेनंतर १ महिन्याने साधारणतः फळे गोटी ते अंडाकृती असताना फळांवर २५x२० सेमी आकाराच्या कागदी पिशव्यांचे आवरण घालावे.
  • आंबा फळांचे फळमाशींपासुन संरक्षण करण्यासाठी आणि फळांचा आकार व वजन वाढुन डाग विरहीत फळांच्या उत्पादनासाठी वरील दिल्याप्रमाणे कागदी पिशव्यांचे आवरण घालावे.
  • तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात वाढ होते. आणि बाष्पोत्सर्जनाचा दर वाढल्याने पिकावर पाण्याचा ताण निर्माण होऊन फळे अकाली गळतात. सांद्रीभवन व बाष्पीभवन प्रक्रियेतील वाढीमुळे आंब्याच्या झाडांना पाण्याची गरज भासते. अशातच मृदेतील ओलाव्या अभावी झाडांना पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा न झाल्याने नविन फळधारणा झालेल्या बागांमध्ये फळगळ होण्याची शक्यता असते. म्हणुन फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळाची गळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १०० लिटर पाणी दर झाडाला आठवड्यातून एकदा किंवा १० लिटर प्रतिदिन द्यावे, तसेच जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करा.
  • हापुस आंब्यामध्ये फळगळ कमी करण्यासाठी फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर २० पीपीएम नॅप्थेलीन ऍसीटीक ऍसीड (१ ग्रॅम ५० लिटर पाण्यातुन) या संजिवाचे द्रावण मोहोरावर फवारावे. दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची झाल्यावर करावी. नॅप्थेलीन ऍसीटीक ऍसीड प्रथम थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळुन नंतर पाण्यात मिसळावे.
  • चांगल्या प्रतिच्या आंबा फळाच्या उत्पादनाबरोबर आंब्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी १% पोटॅशिअम नायट्रेटची (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना अशा एकुण ३ फवारण्या कराव्यात.

अधिक वाचा: Satbara Durusti : सातबाऱ्यात चूक असेल तर दुरुस्त कशी करायची? वाचा सविस्तर

टॅग्स :आंबाफळेकीड व रोग नियंत्रणफलोत्पादनशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनतापमानहवामान अंदाज