Pune : राज्यातील पशुपालनाच्या व्यवसायाला चालना मिळावी आणि जास्तीत जास्त शेतकरी पशुपालनाकडे वळून शेतीपूरक व्यवसाय वाढीस लागावा या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यात येतात. त्यामध्ये शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना २० टक्क्यांपासून ८० टक्क्यांपर्यंतचे अनुदान देण्यात येते. यामध्ये कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, मुरघास निर्मिती अशा व्यवसायांचा सामावेश आहे.
दरम्यान, पशुसंवर्धन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थेट गाई, म्हशी आणि शेळ्या-मेंढ्यांचे वाटप केले जाते. त्याबरोबरच गोठ्याची बांधणी करण्यासाठीसुद्धा योजना राबवल्या आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी भाग घेऊ शकतात.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे शेती असणे आवश्यक आहे. काही योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने तर काही योजनांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येतात. अशा योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट द्यावी.
राबवण्यात येणाऱ्या योजना कोणत्या
१) २ दुधाळ संकरित किंवा देशी गायी किंवा म्हशींचे वाटप योजना
२) अंशतः ठाणबद्ध पद्धतीने शेळी किंवा मेंढी पालनाद्वारे शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देण्याची योजना
३) जिल्हास्तरीय १००० मांसल-कुक्कुटपालन पक्षी संगोपनाद्वारे व्यवसाय योजना
४) एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम योजना
५) शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप योजना
६) देशी गोवंशीच्या कालवडी, सुधारीत / देशी पारड्यांचीची जोपासना करण्यासाठी अर्थसहाय्य योजना
७) मुरघास निर्मितीस प्रोत्साहन-सायलेज बॅग खरेदीस अनुदान योजना
८) मुरघास वापरासाठी अनुदान योजना
९) टिएमआर (टोटल मिक्स रॅशन) वापरासाठी प्रोत्साहनपर अनुदान योजना
१०) खनिज मिश्रण वापरासाठी अनुदान योजना