अंजीर फळामध्ये लोह, कॉपर व कॅल्शियम ही खनिजे तसेच जीवनसत्वे विपुल प्रमाणात असतात. त्यामुळे त्यास आयुर्वेदात खूप महत्व आहे. अंजीर फळापासून सुके अंजीर, जॅम, अंजीर बर्फी यासारखे पदार्थ तयार केले जातात.
महाराष्ट्रात राज्यात गेल्या १० ते १५ वर्षापासुन अंजीर हे एक महत्वाचे पीक बनले आहे. भारत देशामध्ये अंजीराची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटका व तमिळनाडु या राज्यात केली जाते.
अंजीराच्या प्रमुख जाती
१) पूना फिग
या जातीच्या अंजीराच्या फळाचा रंग किरमिजी लाल रंगाचा असतो. फळाचे सरासरी वजन ३० ते ६० ग्रॅम पर्यंत असते. फळामध्ये १६ ते १७ ब्रीक्स पर्यंत साखर असते. पाच वर्ष वयाच्या झाडापासून सरासरी २५ ते ३० किलो फळाचे उत्पादन मिळते
२) फुले राजेवाडी
या जातीच्या अंजीराच्या फळांचा रंग किरमिजी लाल रंगाचा असतो. फळाचे सरासरी वजन ६० ते ८० ग्रॅम पर्यंत असते. १६ ते १७ ब्रीक्स पर्यंत साखर असते. पाच वर्ष वयाच्या झाडापासून सरासरी २८ ते ३० किलो फळाचे उत्पादन मिळते
३) दिनकर
ही जात पूना अंजीर या जातीमधून निवड पध्दतीने निवडलेली असून या जातीची फळे किरमीजी लाल रंगाची असतात. फळाचे सरासरी वजन ४० ते ७० ग्रॅम पर्यंत असते. फळामध्ये साखरेचे प्रमाण १६ ते १८ ब्रीक्स पर्यंत असते. पाच वर्षे वयाच्या झाडापासून २५ ते ३० किलो पर्यंत उत्पादन मिळते.
४) एक्सेल
ही एमेरिकन जात असून या जातीची फळे पिवळसर हिरव्या रंगाची असतात. फळाचे सरासरी वजन ३० ते ४० ग्रॅम पर्यंत असते. फळामध्ये साखरेचे प्रमाण १८ ब्रीक्स पर्यंत असते. सरासरी २० किलो पर्यंत उत्पादन पाच वर्षे वयाच्या झाडापासून मिळते.
५) कोनाद्रिया
ही अमेरिकन जात असून या जातीची फळे हिरव्या रंगाची असतात. फळाचे सरासरी वजन ४० ते ७० ग्रॅम असते. फळामध्ये साखरेचे प्रमाण १६ ते १८ ब्रीक्स असते. पाच वर्षे वयाच्या झाडापासून सरासरी २५ किलोपर्यंत उत्पादन मिळते.
६) दियन्ना
ही अमेरिकन जात असून या जातीची फळे मोठ्या आकाराची व सोनेरी असतात. फळाचे सरासरी उत्पादन ५० ते १०० ग्रॅम असते. फळामध्ये साखरेचे प्रमाण १६ ते १८ ब्रीक्स पर्यंत असते. सुके अंजीर तयार करण्यासाठी ही जात चांगली आहे. या जातीच्या पाच वर्ष वयाच्या झाडापासून २५ ते २८ किलो पर्यंत उत्पादन मिळते.
अधिक वाचा: Guti Kalam : डाळिंब व पेरू फळझाडांमध्ये गुटी कलम कसे करावे वाचा सविस्तर