Lokmat Agro >स्मार्ट शेती > आरोग्य पेरणी -शेतकरी मित्रांनो, तुमचं व्यक्तिमत्व कुठल्या प्रकारचं? जाणून घ्या रहस्य

आरोग्य पेरणी -शेतकरी मित्रांनो, तुमचं व्यक्तिमत्व कुठल्या प्रकारचं? जाणून घ्या रहस्य

Arogya perani type A and type B personality in farmers revels | आरोग्य पेरणी -शेतकरी मित्रांनो, तुमचं व्यक्तिमत्व कुठल्या प्रकारचं? जाणून घ्या रहस्य

आरोग्य पेरणी -शेतकरी मित्रांनो, तुमचं व्यक्तिमत्व कुठल्या प्रकारचं? जाणून घ्या रहस्य

(आरोग्य-पेरणी-१): शेतकरी बंधूंनो, तणाव मुक्त राहून साध्या सोप्या पद्धतीने आनंदी कसं राहायचं? कितीही संकटे आली तरीही ठाम राहून सकारात्मक विचार कसा करायचा? आरोग्याच्या नित्य प्रश्नावर मात कशी करायची? अशा समग्र समस्यांवर आरोग्याची पेरणी करणारं करणारं हे विशेष सदर.

(आरोग्य-पेरणी-१): शेतकरी बंधूंनो, तणाव मुक्त राहून साध्या सोप्या पद्धतीने आनंदी कसं राहायचं? कितीही संकटे आली तरीही ठाम राहून सकारात्मक विचार कसा करायचा? आरोग्याच्या नित्य प्रश्नावर मात कशी करायची? अशा समग्र समस्यांवर आरोग्याची पेरणी करणारं करणारं हे विशेष सदर.

शेअर :

Join us
Join usNext

शेतकरी मित्रांनो, आपण बरेचदा वाचलं असेल किंवा माध्यमातून पाहिलं असेल की जपान किंवा रशियात लोक शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतात. यावर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आपण जेव्हा त्यामागील रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यामागं त्यांची शाश्वत जीवनशैली आणि जगण्याचं तत्त्वज्ञान दडलेलं आहे. वयाची पन्नाशी किंवा साठी ओलांडल्यानंतर ते असं समजतात की आता जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे, ते बोनस आहे. म्हणून ते सार्थकी लावलं पाहिजें. भरभरून जगलं पाहिजे. आणि ते तसं जगण्याचा प्रयत्न करतात, परिणामी ते आरामात शंभरीपर्यंत ठणठणीत आयुष्य जगू शकतात. माझ्या लहानपणी भारतातलं सरासरी आयुष्यमान हे एकोणचाळीस वर्षे इतकं होतं. आता त्यात वाढ होऊन ते सरासरी 70 पर्यंत वाढलेलं आहे. पण जपान, रशिया आणि अमेरिकेतील सरासरी आयुष्यमान यापेक्षाही जास्त आहे. यासंदर्भात तेथील लोकांचे सर्वेक्षण केल्यावर असं आढळून आले की ते नेहमी कार्यरत राहतात.

त्यांना कशात आनंद मिळतो,  तर तो आहे सतत काही ना काही कामात स्वत:ला गुंतवून घेण्यात. निवृत्तीनंतरही तेथील लोक काही ना काही काम करत असतात, मग ते स्वत: स्वयंपाक करण्याचं असो, बागकाम करण्याचं असो किंवा अन्य काही छोटे-मोठे उद्योग-उपक्रम करण्याचे असो. घरापुढे किंवा गॅलरीत बाग तयार करणे, त्यांची निगा राखणे, त्यांना पाणी देणे यात एकप्रकारचा आनंदच दडलेला असतो. याउलट आपल्याकडची तरुण मंडळी मात्र खूर्चीत बसून राहतात किंवा एका जागी बसून मोबाईल-टीव्हीमध्ये तासनतास वेळ दवडतात. अनेकदा टीव्हीवरील मालिकांत घरगुती भांडणं आणि हिंसाचाराचेच प्रदर्शन असते. त्यातून टीव्ही बघणाऱ्यांना आनंद मिळण्यापेक्षा नात्यातल्या ताणतणावांचे आयते प्रशिक्षणच मिळण्याची शक्यता जास्त. त्यापेक्षा चांगल्या गोष्टींत कार्यरत होणे आणि त्यात मन गुंतवणे हे चांगला आनंद मिळविण्याचे सोपे साधन म्हणता येईल. जगताना प्रत्येकाला आनंद मिळाला पाहिजे ही सर्वांचीच अपेक्षा असते, पण आनंदी जगताना दु:खही सहन करण्याची मनाची तयारी केली की काही दिवसांनी ते दु:ख कदाचित दु:ख वाटणार नाही. जीवनाचा एक भाग म्हणून आपण ते स्वीकारू शकू आणि आनंदाची पुन्हा मजा घेऊ शकू.

जगात सर्वात महत्त्वाचं कोण बरं? 
जगात सर्वात महत्त्वाचं कोण? असा विचार केला, तर त्याचे उत्तर देताना माकडीन आणि तिच्या पिलाच्या गोष्टीचे देता येईल. एका पाणी भरलेल्या हौदात पिलासह सोडलेली माकडीन पाण्यापासून बचावासाठी शेवटी आपल्या पिलालाच पायाखाली घेते आणि जिवंत राहण्याचा प्रयत्न करते. तात्पर्य जगात सर्वात महत्त्वाचा आहे तो आपला जीव, पर्यायाने आपण स्वत:. हेच आम्ही आमच्या रुग्णांना सांगत असतो. तुम्ही जर सर्वात महत्त्वाचे असाल, तर आजार होऊ नये म्हणून तुम्ही काय प्रयत्न करता? आजकाल विविध प्रकारे व्यसनाधीनता वाढत चालली आहे. दारू, तंबाखू, गुटखा आणि असेच घातक व्यसन म्हणजे मोबाईल. आम्ही रुग्णांना व्यसन सोडायला सांगतो. मोबाईलचेही व्यसन चांगले नसते, तेही सोडायला सांगतो. अनेकजण तात्पुरते हो म्हणतात, पण काही स्पष्टपणे सांगतात की डॉक्टरसाहेब, तुम्ही दुसरा काहीही उपाय सांगा, पण आम्ही काही हे व्यसन सोडणार नाही. काही खोटंच सांगतात की आम्ही व्यसन सोडलंय. असं खोटं बोलून ते त्यांचंच नुकसान करत असतात. आम्ही त्यांना सांगत असतो की व्यसन केल्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य दहा वर्षांनी कमी करत आहातच, शिवाय तुमच्या जीवनातला आनंदही कमी करून घेत आहात. या व्यसनांपायी जगण्यातला आनंद आपल्यापासून खूप दूर जातो हे वास्तव आहे.

फार पूर्वी डार्विन या शास्त्रज्ञाने ‘अस्तित्वासाठी संघर्ष’ असा एक सिद्धांत मांडला होता. त्यानुसार ज्याला ज्याला जीव आहे, तो प्रत्येक क्षणी मृत्यूला टाळत असतो. याचं अलीकडचं उदाहरण म्हणजे कोव्हिडचे विषाणू. आपण लसींद्वारे त्यांना संपविण्याचा प्रयत्न केला, पण या विषाणूने प्रत्येक वेळेस आपल्यात बदल करून, नवीन म्युटेशन्सद्वारे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न केला. पेनिसिलिनचा शोध फ्लेमिंग नावाच्या शास्त्रज्ञाला अचानकच लागला. पण त्यानं क्रांती घडविली. पण आजकाल पेनिसिलिनविरोधात जीवाणूंमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण झालेली आहे. डार्विनचा सिद्धांत किती पूरक आहे, हे या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे.

वृद्धापकाळात तरुण दिसण्याचे महत्त्व 
बरीचशी मंडळी वयाच्या मानानं तरुण दिसतात. काही ऐंशीच्या घरात असतात, पण प्रत्यक्षात दिसताना पन्नाशी किंवा साठीचेच दिसतात. याउलट तिशी किंवा चाळिशीतल्या काही व्यक्ती वयाच्या मानानं जास्त म्हातारे दिसू लागतात. हा फरक कशामुळं पडत असावा? तर जीवनशैलीमुळं. आपण ज्या जीवनशैलीत जगतो तिच्यात आपल्याला आनंद किती मिळतो? समाधान किती मिळतं यावर आपण वयापेक्षा तरुण दिसतो की वयस्कर हे अवलंबून आहे. आजकाळ आधुनिक जीवनशैलीचा अंगीकार करताना अनेकजण वस्तू आणि पैशांच्या मागे धावताना दिसतात. पण त्यातून त्यांना आनंद मिळेलच असे नाही. कारण पैसा ही वेगळी गोष्ट आहे आणि आनंद ही वेगळी गोष्ट आहे. याबाबत एका श्रीमंत उद्योगपतीचं उदाहरण देता येईल. या उद्योगपतीने हजारो कोटी रुपये कमावले, पण त्याला हवा तसा आनंद काही कमावता आला नाही. पैशाच्या मागे धावताना त्याला जीवनशैलीशी संबंधित अनेक आजार झाले आणि शेवटी वयाची साठी गाठत असतानाच त्याला या आजारांमुळं जगाचा निरोप घ्यावा लागला.

तुमचं व्यक्तिमत्व नेमकं कुठल्या प्रकारचं? 
समाजात दोन प्रकारची व्यक्तीमत्वं असतात. टाईप ए आणि टाईप बी. ९९ % तरुण या टाईप ए प्रकारात मोडतात. त्यांचा स्वभाव अगदी अधीर असतो. कुठलीही गोष्ट आताच पाहिजे अशा भावनेतून मग ते वेगवेगळ्या गोष्टींमागे धावत राहतात. त्यातून ते असमाधानी राहतात. स्पर्धात्मक आणि नेहमी जिंकायची वृत्ती तयार होते. यातील अनेकजण तणावग्रस्त आणि रागीटही असतात. अनेकदा ते आईवडिलांचं, भावंडांचं, मोठ्यांचं ऐकत नाहीत. उलट त्यांच्यावर रागावतात, प्रसंगी त्यांचा अनादर करतात. अशा लोकांना जेव्हा आपण विचारतो की तुम्ही समाधान आहात का? तर त्याचे उत्तर ते होकारात्मक देतात, पण प्रत्यक्षात त्याच्या जवळच्या व्यक्ती मात्र सांगतात की तो किंवा ती समाधानी नाहीत. अशा लोकांना जीवनशैलीचे आजार किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स लवकर होण्याची शक्यता असते.

याउलट असतात बी टाईप व्यक्तीमत्वं. उदाहरणादाखल मी माझ्या काही मित्रांचं देईन की ज्यांच्याकडून आयुष्यात मी नेहमीच शिकत आलो. उद्या कोणाला भेटायचं? काय करायचं असं सर्व त्यांचं दुसऱ्या दिवसाचं वेळापत्रक ठरलेलं असायचं. आपल्यापेक्षा लहान माणसाचीही विचारपूस करणे, अहंकार सोडून डाऊन टू अर्थ राहणे, प्रत्येक गोष्टीचे नियोजन करणे, समाजात मिसळणे, शांत आणि समाधानी जीवनशैली जगणे इत्यादी गोष्टी ते करत राहतात. त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. तर अशी मदत करणारी, आनंदाची देवघेव करणारी माणसं दुसऱ्या प्रकारात मोडतात. कुणाचा द्वेष न करणे, कुणाचे पाय न ओढणे, प्रत्येकाशी चांगलं आणि नम्र बोलणे हे या लोकांचे गुणधर्म असतात. जीवनशैली विषयक आजार शक्यतो त्यांच्या वाटेला जात नाहीत. कारण म्हणतात ना की इन्वेस्ट युवरसेल्फ इन अ जॉय, म्हणजेच आपण जगताना प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला हवा. तो कसा? ते आपण पुढच्या भागात पाहू.

-डॉ. अशोक वासलवार, चंद्रपूर 
ashok50wasalwar@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ असून असोसिएशन ऑफ फिजिशीयन्स ऑफ इंडिया, विदर्भचे पूर्वाध्यक्ष आहेत.)

Web Title: Arogya perani type A and type B personality in farmers revels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.