Join us

आरोग्यपेरणी : आनंदी शेतकऱ्याची शेतीही असते समृद्ध, जाणून घ्या ‘बी’ पर्सनॅलिटीबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 3:28 PM

माणसाचा जन्म एकदा मिळतो असं म्हणतात. त्या आयुष्यात रडत, कुरकुरत, सुडाची भावना ठेवत नकारात्मक आयुष्य जगायचं का समाधानानं आयुष्याचा छानसा आस्वाद घ्यायचा, हे आपल्यावर अवलंबून आहे. मदतीची भावना, कृतज्ञता, सकारात्मक विचार हे माणसाचं व्यक्तिमत्त्व घडवतात. आशावादी, सकारात्मक विचारांच्या माणसांचं आयुष्य हे मानसशास्त्रानुसार ‘वर्ग ब’ व्यक्तिमत्व म्हणजेच ‘ब’ वर्गामध्ये मोडतं.  ही माणसं स्वतःचं आयुष्य उजळवून टाकतातच; पण दुसऱ्यांसाठीही चांगले दिशादर्शक ठरू शकतात.

एकदा एक मुलगा आपल्या आईला घेऊन डॉक्टरांकडे गेला. त्याच्या आईला मानसिक त्रास होता, मधुमेहही होता. डॉक्टरांना तो मुलगा व्यसनी वाटला, त्याची गरिबी चेहऱ्यावरून दिसत होती. डॉक्टरांचं तपासून झाल्यावर आणि प्रीस्क्रिप्शन घेतल्यावर तो तिथून बाहेर पडला. त्यानंतर पंधराच दिवसांत तो रागारागात पुन्हा डॉक्टरांकडं गेला. त्यानं त्यांच्यासमोर औषधं ठेवली. म्हणाला, ‘‘तुम्ही माझ्याकडून एवढी फी घेतलीत; पण माझ्या आईला अजिबात आराम पडलेला नाहीये.’’ त्याच्या या बोलण्याचा डॉक्टरांनाही राग आला, पण ते शांत राहिले. त्यांना वाटलं, याला हाकलून द्यावं किंवा उत्तर द्यावं; पण त्यांनी राग गिळला. 

त्या मुलाची मागणी अशी होती की, आईच्या तब्येतीत फरक पडला नसल्यानं त्याचे फी म्हणून दिलेले पैसे डॉक्टरांनी परत द्यावेत. ते ऐकल्यावर डॉक्टरांनी शांतपणे त्याचे पैसे त्याला परत केले. पैसे घेऊन तो गेला तो तासाभरानं परत डॉक्टरांकडं आला. मान खाली घालून त्यांना म्हणाला, ‘‘डॉक्टर, माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्या लहानपणीच वडील गेले. मी छोटंमोठं काम करून कसेतरी पैसे मिळवतो. त्यामुळं मी रागाच्या भरात तुमच्याशी वाट्टेल ते बोललो. आता माझ्या लक्षात आलंय की, मी चुकलो, तुम्हाला बोलायला नको होतं. आपली आई पहिल्यासारखी व्यवस्थित होणार नाही हेही मला माहीत होतं, तरीही मी तुमच्याशी असा वागलो.’’

एवढं बोलून त्यानं डॉक्टरांची माफी मागितली. हे घडलं कारण डॉक्टर त्याच्याशी ‘वर्ग ब’ व्यक्तिमत्त्वाप्रमाणे वागले. त्याच्या रागाला त्यांनी शांतपणे कृतीतून उत्तर दिलं. त्यांच्या या वागण्यामुळं तो नमला. पण इथं डॉक्टर जर वर्ग अ च्या मनोवृत्तीप्रमाणे वागले असते तर...

‘‘वर्ग ब’’ व्यक्तिमत्त्व कसे असते?

‘‘वर्ग ब’’ व्यक्तिमत्त्व हे आदर्श मानावं लागेल. कारण या लोकांचं वागणं हे विवेकपूर्ण आणि तर्कशुद्ध असतं.  ही माणसं माहीतगार असतात. प्रत्येक घडामोडीची माहिती घेण्याची त्यांची तीव्र इच्छा असते. त्यांचा स्वभावही थोडा मनोरंजक आणि विनोदी असतो. शारीरिक दृष्ट्या नाही; पण बौद्धिक दृष्ट्या त्यांचं व्यक्तिमत्त्व जास्त प्रभावी असतं. हे लोक बोलायला लागला की असं वाटतं, त्यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. ध्येयवाद हा त्यांच्या मेंदूमध्ये असतो. सकारात्मक विचारसरणी हा या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा भाग असतो. प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करण्याची त्यांची वृत्ती असते. या व्यक्तींना कधी अपयश मिळालं तर ते म्हणतात की, यशाची पायरी ही अपयशातूनच सुरू होते. कोणत्याही कामाच्या पहिल्या वेळेला कुठल्या क्षेत्रात यश मिळेलच असं नाही; पण म्हणून हे लोक खचून जात नाहीत. नकारात्मक विचार करत नाहीत. उलट ‘मला हे जमत नाही, ते जमत नाही’, असं म्हणण्यापेक्षा ‘हे मला हे नक्की जमणार आहे’, अशी आशावादी, सकारात्मक वृत्ती ठेवणाऱ्या व्यक्तीचं जीवन हे या वर्गात मोडतं. हे लोक ‘माझ्यामुळंच मला अपयश मिळालं; पण मी प्रयत्न नाही केला म्हणून तसं झालं,’ हे मान्य करून यशाचा मार्ग कोणत्या दिशेनं जातो, हे शोधतात. एखादं काम चांगलं कसं करता येईल, त्यातून आयु्ष्य ब्राईट कसं करता येईल, असा विचार करणाऱ्या या व्यक्ती या गटात मोडतात.

उत्साह कसा निर्माण होईल, योग्य शब्दांचा योग्य ठिकाणी कसा वापर करायचा, हे बी गटातल्या व्यक्तीला बरेच वेळा जमतं.

गाडी चालवताना आपण रेसिंग करतो ना, तसं रेसिंग करताना ही रेस आपल्याला कुठं घेऊन जाणार याचा आपण विचार नाही करत. असा विचार न करणारे लोक ‘टाईप ए’ किंवा ‘वर्ग अ’ मध्ये मोडतात. पण रेसिंग ही आपल्याला जास्त लाभदायी नाही, त्यापेक्षा आपली वाट पाहणारे घरचे लोक जास्त महत्त्वाचे आहेत, असा विचार ज्याच्यात असतो तो ‘वर्ग ब’ मध्ये मोडतो. नम्रता, जमिनीवर पाय असणे, सावकाश बोलणं, सभ्यता, प्रत्येक गोष्टीत काही ना काही सर्जनशीलता असणे, शिष्टाचार पाळणं हे ज्याच्यात आहे, तो या गटातला असतो.

एका लाकडाच्या वखारीत कितीतरी वर्षे लाकूड कापण्याचं काम करणारा एक माणूस होता. प्रयत्न करूनही तो दहा लाकडांपेक्षा जास्त लाकडे कापू शकत नव्हता. त्या वखारीत एक नवीन माणूस काम करण्यासाठी आला, तो जास्त लाकडं कापत असे. कुतूहलाने जुन्या, अनुभवी माणसानं त्याला विचारलं, ‘‘इथं काम करायला लागून मला इतकी वर्ष झाली, पण मी दहाहून अधिक लाकडं रोज कापू शकत नाही, तू एवढी लाकडं कशी कापू शकतोस?’’

तो उत्तरला, ‘‘मी लाकूड कापतो तेव्हा माझं पूर्ण लक्ष कामात असतं. एक तास झाला की मी माझ्या मेंदूला विश्रांती देतो. त्यामुळं शरीरालाही विश्रांती मिळते. आणि ताज्यातवान्या मनानं पुन्हा काम सुरू केल्यावर जास्त उत्साहानं लाकडं कापू शकतो.’’ आपल्या हुशारीने उत्पादन जास्त देण्याची क्षमता ‘वर्ग ब’ मध्ये असते. 

एकदा एका शिक्षकांनी एका खेड्यातल्या शाळेतल्या दोन मुलांना विचारलं, ‘‘तुम्ही दोघं मित्र जंगलातून जात आहात, तिकडून वाघ आला तर तुम्ही काय कराल?’’

यावर ते मित्र म्हणाले, बचावासाठी आम्ही दोघं पळायला लागू; पण आम्हाला वाघ पकडायला येतोय असं वाटलं तर आम्ही दोघं मिळून त्याचा प्रतिकार करू. त्याच्याशी लढू. एक तर वाघ मरेल किंवा आम्ही दोघे मरु, पण मित्राला एकटं सोडणार नाही.’’

ही संघटित वृत्ती ‘वर्ग ब’ म्हणजेच परोपकारी वृत्तीची साक्ष देते. त्या शिक्षकांनी हाच प्रश्न शहरातल्या दोन मुलांना विचारला, तेव्हा एकानं उत्तर दिलं, ‘‘मी मित्रापेक्षा वेगानं धावेन. म्हणजे वाघ त्याला पकडेल, मला नाही पकडणार.’’ ही ‘टाईप ए’ची स्वार्थी मनोवृत्ती. ए गट आणि बी गट या दोन मनोवृत्तींमध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. ’वर्ग ब’ मधील माणसांची मनोवृत्ती ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची, सगळ्यांचा विचार करण्याची असते. ती एककल्ली किंवा आत्मकेंद्री नसते.

उदाहरण द्यायचं तर एखादी म्हातारी रस्ता ओलांडते आहे. आणि आपण तिथून चाललो आहोत. तुम्ही तिला मदत कराल आणि मी नाही करणार. म्हणजे तुम्ही ‘वर्ग ब’ मध्ये मोडणार आणि मी टाईप ए मध्ये. अशीच एक गोष्ट वाचल्याचं आठवतंय. एक आश्रम होता. तिथल्या मुनींनी शिष्यांना चार वर्षं शिकवलं. खरंच मुलांना ज्ञान देण्याचा काही फायदा झालाय का, हे त्यांना पाहायचं होतं. त्यासाठी त्यांनी रस्त्यावर मार्गात काटे टाकले आणि शिष्यांना सांगितलं की, तुम्ही इथून जा. सगळी मुलं काट्यांवर उडी मारून गेली. पण शेवटून तिसऱ्या मुलांने मात्र तसं केलं नाही. त्यांनी ते काटे बाजूला केले आणि त्यांच्यानंतर येणाऱ्या दोन मुलांसाठी रस्ता मोकळा केला. ही सेवाभावी वृत्तीची मुलं पुढं जाऊन ‘वर्ग ब’ मध्ये मोडतात.

‘ब’ व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य

हे व्यक्तिमत्त्वं वेळेचा नेहमी योग्य वापर करतात. ईश्वरानं किंवा निसर्गानं प्रत्येकाला चोवीसच तास दिले आहेत. एक सेकंद कमी किंवा जास्त नाही दिला कुणाला. पण त्या वेळेचा उपयोग यशस्वी माणूस कसा करतो, हे महत्त्वाचं असतं. वेळेचं योग्य नियोजन हे बी टाईप माणसांत असतं. समोरच्या माणसाच्या बोलण्याची कला आपल्याला समजते. डोळ्यात डोळे घालून समोरचा माणूस कसा आहे, हे आपण पाहू शकतो. माणसाचे डोळे बोलतात, चेहरा बोलतो. एखाद्याच्या डोळ्यात चांगले भाव दिसले तर तो नक्कीच बी टाईपचा माणूस आहे, हे ओळखता येतं. याचं एक उदाहरण देतो.

एक शेठ होता, त्याच्याकडे एक नोकर होता. तो नोकर त्या माणसाकडं काम करायला आला तेव्हा तो ईतका गरीब, दीन होता, त्याच्या अंगावरचे कपडे फाटके होते. तो खूप चांगलं काम करायचा. प्रामाणिकपणानं करायचा. ते पाहून खुश होऊन त्या शेठनं त्याला बढती दिली, त्याचा पगारही वाढला. या माणसाची एक झोपडी होती, त्या झोपडीत तो गेला की पंधरा-वीस मिनिटं बाहेर यायचा नाही. हे पाहून त्याच्या मालकाला संशय आला, हा चोरी करतोय का, असा तो संशय घ्यायला लागला. एकदा त्यानं ठरवलं की हा काय करतोय, ते पाहायचंच. तो त्याच्याकडं गेला, झोपडीचं दार ठोठावलं. ‘तू इतका वेळ काय करतोयस हे मला पाहायचंय. चोरी करतो आहेस का?’ नोकर म्हणाला, ‘नाही साहेब, मी चोरी नाही करत. माझी एक जुनी गंजलेली पेटी आहे, त्यात मी पहिल्यांदा इथे आलो तेव्हा घातलेला फाटका ड्रेस ठेवला आहे. मी रोज त्या ड्रेसकडं पाहतो आणि तुमचे उपकार कसे फेडावेत, असा विचार करतो.’’ हे उत्तर ऐकून शेठला आपल्याच विचारांची लाज वाटली आणि नोकरावर त्याचा विश्वास आणखी दृढ झाला. उपकाराची परतफेड करणारा तो नोकर ‘वर्ग ब’मध्ये येतो. 

आपल्याला माहीतच आहे, वाल्या हा डाकू होता, वाल्याचा वाल्मिकी झाला. अशा काही घटना घडतात की ज्यामुळे तुम्ही चांगल्याचे वाईट होता आणि वाईटाचे चांगलेही. म्हणजे तुम्ही टाईप ‘ए’ मधून बी मध्ये जाता किंवा ‘वर्ग ब’ मधून ए मध्ये जाता. कृतज्ञता ज्याच्या अंगी असते तो माणूस चांगला असतो. संगीत, नाटक, कलात्मक दृष्टिकोनाची आवड ही टाईप बी मध्ये असते. 

त्याचा मेंदू त्याला स्वीकारतो. एखादी हिंसक बातमी पाहिली किंवा गुन्हेगारीबद्दल वाचलं- तर ‘वर्ग ब’च्या माणसांना त्रास होतो. ’वर्ग ब’ ची माणसं ही नेहमी जमिनीवर पाय ठेवून असतात, त्यांच्यामध्ये ‘आपण म्हणजे कोण’ याचा लवलेशही नसतो.   कॉमन मॅन म्हणून जगण्याची वृत्ती बी टाईपमध्ये येते. ती स्वीकारणं- मीपणा सोडून देणं हे ‘वर्ग ब’ व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ही माणसं वेळेवर जेवतात, वेळेवर झोपतात. यांचं वेळापत्रक ठरलेलं असतं. त्यांचा जीवनाचा चांगला अभ्यास असतो. दुसऱ्याचं चांगलं स्वीकारायची मानसिकता असते. तसेच एका व्यक्तीला कर्करोग झाला होता, सहा महिन्यांत तू मरणार आहेस असं त्याला सांगितल्यावर त्यानं आयुष्याचा लोभ सोडून दिला. तो परोपकारी झाला. त्यावेळी तो टाईप ए मधला माणूस बी मध्ये आला.

महात्मा गांधी यांचं व्यक्तिमत्त्व ‘वर्ग ब’ मध्ये मोडणारं होतं. मुकेशचं एक गाणं आहे- तुम्हे जिंदगीके उजाले मुबारक, अंधेरे हमे रास आने लगे है ... प्रेमात ताटातुट झाल्यावर- तुला चांगली जिंदगी मिळू दे- असा त्याग करणारं व्यक्तिमत्त्व कमी पाहायला मिळतं. ते व्यक्तिमत्त्व ‘वर्ग ब’ या प्रकारचं असतं. पण प्रेमात त्रास देणारी, त्रास करून घेणारी, प्रसंगी क्रूर होणारी व्यक्तिमत्त्व ही टाईप ए मधली असतात. कोणत्याही बाबतीत नकारात्मक विचार करणारा नंतर क्रूरही होऊ शकतो.

रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, थायराईड या लाईफस्टाईलशी संबंधित समस्या टाईप एच्या लोकांना जास्त होतात. ज्यांच्यामध्ये सेरोटोनिन जास्त तयार होतं ते ‘वर्ग ब’ पर्सनॅलिटीचे लोक असतात. मेंदूतील ट्रान्समीटर्स न्यूरॉन्सना जागृत करतात. सकाळी उठलं पाहिजे, रात्री झोप घेतली पाहिजे, हे सगळं हार्मोन्सवर अवलंबून असतं. या धर्तीवर ‘वर्ग ब’ असलेली व्यक्तित्त्वं ही स्वतःला आनंदात आणि परफेक्ट ठेवण्याचा विचार करत असतात. 

आजार आणि स्वभावाचा असतो संबंध

माणसाला दोन प्रकारचे आजार होतात. एक संसर्गजन्य आणि दुसरे असंसर्गजन्य . संसर्गजन्य म्हणजे मलेरिया, टायफॉईड अतिसार दुसऱ्यांपासून जे आपल्याला होतात. असंसर्गजन्य आजार आपल्या चुकीच्या जीवन शैलीमुळे होतात . लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, नैराश्य, थायरॉईड, सायकिॲट्री डिसॉर्डर... हे असंसर्गजन्य आजार शक्यतो टाईप ए च्या लोकांना होतात, ’वर्ग ब’च्या लोकांना झाले तर त्याची तीव्रता कमी असते. आयुष्य हे फाईट आणि आणि फ्लाईट असल्यामुळे मुंग्यांपासून माणसांपर्यंत आयुष्याची चढाओढ असतेच.

स्ट्रेसशी संबंधित असलेले अनेक आजार आता पाहायला मिळतात. राग येणं हेही स्ट्रेसशी संबंधित आहे. ’वर्ग ब’ मधील व्यक्तींना खूप राग आला तर त्या वातावरणातून बाहेर पडण्याची कलाही त्यांना अवगत असते. आमचे एक मित्र मोठे गमतीदार होते. ते पत्नीबरोबर रोज पत्ते खेळायचे. एकदा ते मला म्हणाले, ‘खेळताना मी नेहमी जाणूनबुजून हरतो आणि शिक्षा म्हणून पाऊण तास फिरून येतो. त्यामुळंच माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे व पत्नीही खुष आहे.  आपली तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपण हार स्वीकारायची, असं मी ठरवलंय.

स्ट्रेसचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे पैसा. आयुष्यासाठी पैसा हा अत्यंत आवश्यक पण तो सर्वस्व नाहीये. आपल्याला जगायला किती पैसा लागतो? तुमच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत- अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य... त्या भागवता येतील इतकाच पैसा हवा. जास्त पैसा नको. ’वर्ग ब’ मधले लोक वरचे पैसे मिळतात तो बोनस आहे, त्याचा मी चांगला वापर केला पाहिजे, असा विचार करतात.

या जगात प्रत्येक गोष्ट नश्वर आहे. ज्याला जीव आहे तो नश्वर आहे. चिंता करण्यापेक्षा आनंदात जगावं, असं ‘वर्ग ब’ चं तत्त्व आहे. मुंबईच्या एका डॉक्टरांना कर्करोग झाला. ‘मी स्वतः सर्जन होतो तरीही मला पोटाचा कर्करोग झाला’ असं त्यांना नेहमी वाटायचं. सगळे उपचार केले तरी त्यांना बरं वाटत नव्हतं. शेवटी ते अध्यात्माकडं वळले. त्यामुळे त्यांना मानसिक आधार मिळाला. अध्यात्मामुळे पुढं ते अधिक चांगल्या प्रकारे जगले. आपण इतके दिवस जगणार आहोत, मग निराशेत का जगायचं, छान आनंदी जगू या, अध्यात्मातून आत्मिक समाधान मिळवूया, असं त्यांनी मनाला समजावलं. त्यांच्यात अध्यात्मामुळं सकारात्मक बदल कसा झाला, याबाबत त्यांनी छान लिहिलं आहे. म्हणजेच समुपदेशन रोगराई पळवते, दुःखाला कमी करते. हे सकारात्मक वृत्तीचं प्रतीक आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीत अशी काही मंडळी आहेत त्यांना आपण मॅनेजमेंट गुरू म्हणू. ही व्यक्तिमत्त्व ‘वर्ग ब’ मध्ये मोडतात. कृष्ण हे त्याचं मोठं उदाहरण. कृष्णानं भगवत गीतेमध्ये जीवनाचा उद्देश सांगितला आहे. त्यानं गीता सांगताना, अर्जुनाला समजावलं की काही ठिकाणी भावनात्मक न होता वास्तवात जगावंच लागतं. आयुष्य कसं जगायला पाहिजे, विजय कसा मिळवायचा, सकारात्मक दृष्टिकोनातून हे भगवत गीतेत जेवढं चांगलं सांगितलं हे दुसरीकडं कुठंच सांगितलं नाही. चाणक्यानं राजा कसा असला पाहिजे, हे दाखवून दिलं. आताच्या काळात एपीजे अब्दुल कलाम, रतन टाटा, अमिताभ बच्चन यांची ‘वर्ग ब’ साठी नावं घेता येतील. अमिताभना एका पत्रकारानं विचारलं, तुम्ही बॉलिवूड खूप गाजवलंत, पण हॉलिवूडमध्ये तुम्हाला संधी मिळाली नाही. नसिरुद्दीन शाह यांनी तर हॉलिवूडमध्येही नाव कमवलंय. यावर अमिताभ यांनी उत्तर दिलं, नसिरुद्दीनन हे माझ्यापेक्षा ग्रेट आहेत, मी त्यांचा आदर करतो.’’ या उत्तरातूनच अमिताभ यांच्या व्यक्तिमत्त्वाचा चेहरा लक्षात येतो. प्रगतिपथावर जायचं असेल तर ‘वर्ग ब’ स्वीकारायला पाहिजे. लोक आपल्याला चांगलं म्हणतात तेव्हा तुमच्या मेंदूला आणखी चांगलं काम करण्याची इच्छा होते. एका चांगल्या दिशेनं वाटचाल सुरू होते. 

कवी मंगेश पाडगावकर यांनी म्हटल्याप्रमाणे सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत? आयुष्याच्या कोवळ्या कॅनव्हासवर रंगीबेरंगी फुलं कशी फुलवायची हे आपल्या हातात असतं. त्याला प्रेमाचं खत देऊन टवटवीत करायचं की सुकवून टाकायचं हा निर्णय आपला आहे. ’वर्ग ब’ व्यक्तिमत्त्व आपलं असावं असं वाटत असेल तर आयुष्याच्या फुलांचा फुलोरा फुलायलाच हवा.

 -डॉ. अशोक वासलवार, चंद्रपूर ashok50wasalwar@gmail.com (लेखक हृदयरोग तज्ज्ञ आहेत. )

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यशेतकरी