राज्यात दरवर्षी शेती व संलग्न क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालील पुरस्कार दिले जातात.
१) डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार (संख्या १)
• पुरस्कार सुरु वर्ष सन: २०००-२००१
• कृषी क्षेत्रातील कृषी विस्तार, कृषी प्रक्रीया, निर्यात, कृषी उत्पादन, पीक फेरबदल, कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमध्ये अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील कोणत्याही एका शेतकऱ्यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन्मानित करण्यात येते.
• रु. तीन लाख रोख रकमेचे पारितोषिक, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार.
• सन २०१९ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार- २३
२) वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार (संख्या ०८)
• पुरस्कार सुरु वर्ष सन-१९८४-८५
• कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास व फलोत्पादन, ग्रामीण विकास, ज्यामध्ये बायोगॅसचा वापर, शेतकऱ्यांचा विकास इत्यादी संलग्नक्षेत्रात अव्दितीय कार्य करणाऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी एकूण ०८ शेतकरी अथवा संस्थाना कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
• रु. दोन लाख रोख रक्कम, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार.
• सन २०१९ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार- २९२
३) जिजामाता कृषीभूषण पुरस्कार (संख्या ०८)
• पुरस्कार सुरु सन १९९५
• राज्यातील शेतीक्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती व या प्रगतीत उत्पादन वाढीत महिलांचाही फार मोठा वाटा आहे व तो सातत्याने वाढत असू, शेती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक चळवळीत महिला सातत्याने पुढे येत आहेत. शेतीविकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाब आहे. तसेच शेतीक्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत पुरस्काराची सुरुवात केली आहे.
• रु. दोन लाख रोख रक्कम, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व पतीसह सत्कार.
• सन २०१९ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार- १११
४) कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार (संख्या ८)
• पुरस्कार सुरु सन २००९-१०
• सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यात प्रोत्साहन देऊन शेती करणाऱ्या तसेच उत्पादीत सेंद्रीय मालाची विक्री व्यवस्था करणे या मुख्य हेतूने राज्यातील जे शेतकरी या संकल्पनेचा अवलंब करत आहेत, अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
• रु. दोन लाख रोख रक्कम, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार.
• सन २०१९ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार- ७८
५) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (संख्या ०८)
• पुरस्कार सुरु सन - १९९४
• जे जाणते शेतकरी त्यांच्या कृषीज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतकऱ्यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील, तसेच इतर व्यक्ती/संस्था ज्या स्वतः शेती करीत नाहीत किंवा ज्यांची स्वतःची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा शेतकऱ्यांना/व्यक्तींना/संस्थांना, त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग (उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडूळशेती इत्यादीमधील) वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्ती तसेच खेड्यांमधून परसबाग वृध्दींगत करणाऱ्या महिला, कृषी विकास मंडळ ज्या गावात सक्रिय आहे. अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
• रु. एक लाख वीस हजार रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार.
• सन २०१९ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार- ८१
६) उद्यान पंडित पुरस्कार (संख्या ८)
• पुरस्कार सुरू सन: २००१-०२
• महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, जमिनीची प्रत व हवामानातील विविधता यामुळे फलोत्पादनास मोठा वाव आहे. भाजीपाला पिके, फळ पिके, फुल पिके, मसाला पिके, औषधी व सुंगधी वनस्पती पिके यापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. तसेच राज्यात फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराने शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
• रु. एक लाख रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार.
• सन २०१९ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार- २२३
७) वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार (संख्या ४०)
• पुरस्कार सुरू सन : १९६७
• शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये सुधारीत शेती अवजारांचा वापर, जमिनीच्या प्रतवारी प्रमाणे पिकांची लागवड, जमिनीचे सपाटीकरण, कंटुर पध्दतीने पेरणी, रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, विहीर/नाला इत्यादी मधील पाणी अडवून शेतीतील नालाबडींग इत्यादीद्वारे तसेच तुषार व ठिबक सिंचन पध्दतीद्वारे पाण्याचा सुयोग्य वापर, पीक संरक्षक औषधांची वेळेवर फवारणी, शेतीपुरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाड लागवड करणे, स्वतःच्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड, शेतकऱ्यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे, राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून आदिवासी गटासह एकूण ४० (चाळीस) शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
• रु. ४४०००/- रोख रक्कम, पारितोषिक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार.
• सन २०१९ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार- १४७१
८) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषी सेवारत्न पुरस्कार (संख्या १०)
• पुरस्कार सुरू सन २०१४
• राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास राज्यशासनाव्दारे सन्मानित करण्यात येते.
• सन २०१९ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार - १३
९) युवा शेतकरी पुरस्कार (संख्या० ८)
• पुरस्कार सुरू सन: २०२०
• वय वर्ष १८ ते ४०
• रु. एक लाख वीस हजार रोख रक्कम, पारितोषिक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार.
इच्छुक शेतकऱ्यांनी पुरस्काराचे प्रस्ताव सादर करण्यासाठी नजिकच्या तालुका कृषी कार्यालयास संपर्क साधावा.