धान हे खरीप हंगामातील प्रमुख पीक असून धान उत्पादन वाढीकरीता शेतकरी रासायनिक खते व इतर खतांचा वापर करतात तसेच काही शेतकरी हिरवळीच्या खतांमध्ये धैंचा, सोनबोरू, गिरीपुष्प लागवड करून चिखलणी करतांनी जमिनीमध्ये गाडतात.
यामध्ये कमी खर्चाचे उत्तम जैविक तसेच हिरवळीचे खत म्हणून धान पिकामध्ये अॅझोलाचा वापर करता येतो.
अॅझोला- अॅझोला ही वनस्पती शेवाळ या प्रकारात मोडते. अॅझोला वनस्पती पाण्यावर तरंगणाऱ्या अवस्थेत आढळते.- या वनस्पती मध्ये प्रथिने, व्हिटॅमिन्स (अ आणि ब) तसेच क्षारतत्वे (कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह व मॅग्नेशियम) मुबलक प्रमाणात आढळतात.- अॅझोलामध्ये २५-३० टक्के प्रथिने, १०-१५ टक्के क्षारद्रव्ये व ७ ते १६ टक्के अमिनो अॅसिडस् असतात.- त्याचप्रमाणे अॅझोलामध्ये पिष्टमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प असते.
अॅझोलाचा धान पिकामध्ये वापर- अॅझोला ही एक पान वनस्पती असून हिरवळीचे खत म्हणून धान पिकात वापरतात.- अॅनाबिना अॅझोली हे शेवाळ अॅझोला सोबत सहजीवी पध्दतीने वाढते व हवेतील मुक्त नत्र स्थिर करते.
अॅझोला वाढविण्याच्या पध्दती१) पहिल्या पध्दतीमध्ये अॅझोला विशिष्ट प्रकारच्या डबक्यात वाढवून भात पेरणीपूर्वी एक महिना अगोदर बांधीत टाकतात व १० ते १५ दिवसांनी अॅझोला नांगराच्या सहाय्याने गाडतात.२) दुसऱ्या प्रकारामध्ये अॅझोला नर्सरीमध्ये वाढवितात. धान रोवणीनंतर/लागवडीनंतर १० दिवसांनी बांधीत टाकतात आणि कोळप्याच्या किंवा इतर यंत्राच्या सहाय्याने जमिनीत गाडतात. प्रति चौरस मिटर क्षेत्रासाठी ५०० ग्रॅम अॅझोला बांध्यामधील पाण्यामध्ये फेकून देतात.
नर्सरीमध्ये अॅझोला उत्पादन कसे घ्यायचे?- अॅझोला वनस्पतीचे उत्पादन घेण्यासाठी झाडाच्या सावलीत ५ बाय ८ फुट आकाराचा खड्डा तयार करावा.- हा खड्डा प्लॅस्टिकच्या विशिष्ट प्रकारच्या आवरणाने आच्छादुन घ्यावा.- १०-१२ किलो काळी माती या प्लॅस्टिकच्या आच्छादनावर पसरवून घ्यावी.- त्याचबरोबर गायीचे शेण दोन किलो व ३० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट दहा लिटर पाण्यात चांगले मिसळावे.- हे मिश्रण खड्ड्यामध्ये टाकावे. अशा मिश्रणात ताजे पाणी दहा सें.मी. उंचीपर्यंत भरावे. या खड्डयात ५०० ग्रॅम ते एक किलो ताजा व स्वच्छ अॅझोला कल्चर टाकावे. अशाप्रकारे तयार केलेल्या खड्डयात अॅझोला वनस्पती वेगाने वाढते व खड्डा १०-१५ दिवसांत अॅझोलाने भरून जातो. त्यानंतर दररोज ५०० ते ६०० ग्रॅम अॅझोलाचे उत्पादन घेता येते. जास्तीचे उत्पादन घेण्यासाठी अशा तयार खड्ड्यात एक किलो गाईचे शेण व २० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट दर पाच दिवसांनी टाकावे. त्याचप्रमाणे दर आठवड्यास क्षार द्रव्याचे मिश्रण यामध्ये टाकावे.
काय काळजी घ्यावी- खड्डा तयार करण्याची जागा ही सावलीत परंतू भरपूर सूर्यप्रकाशात असणारी असावी. त्यावर थेट ऊन पडू देऊ नये.- पाण्याची पातळी (दहा सें.मी.) ही कायम ठेवावी.- वनस्पतीचे रोगराई, किडा, मुंगी, वाळवी इ. पासून संरक्षण करावे.- दर ३० दिवसांनी खड्ड्यातील पाच टक्के काही माती ही ताज्या काळ्या मातीने बदलावी.- दर पाच दिवसांनी खड्यातील २५-३० टक्के जुने पाणी हे ताज्या पाण्याने बदलावे.