महाराष्ट्रात खानदेश, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात उन्हाळी बाजरी (Pearl Millet) घेतली जाते. या काळात उन्हाळ्यात हवामान कोरडे असल्याने अरगट, गोसावी, तांबेरा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो.
त्यामुळे धान्य व चाऱ्याची गुणवत्ता चांगली मिळते. तसेच संरक्षित पाण्याची सोय असल्यास शेतकऱ्यांच्या फायद्यात वाढ होते. त्यामुळे शेतकरी उन्हाळी बाजरी लागवडीला (Cultivation) अधिक पसंती देतात.
सर्वत्र पीक सध्या जोमात आले आहे. या पिकाला पाणी कमी लागते. त्यामुळे ठिबक सिंचनामुळे (Drip Irrigation) पीक चांगलेच बहरले आहे. मागील वर्षी उन्हाळी बाजरीला ज्वारी (Jowar) व गव्हापेक्षा (Wheat) जास्तीचा भाव मिळाला होता. त्यामुळे या पिकाकडे मोठा कल वाढल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळी बाजरी (Bajari) पीक (Crop) पिवळदार निघते. भाकरी देखील चटकदार असते. त्यामुळे आरोग्यासाठी देखील चांगली असते. त्यामुळे बाजारात मागणी वाढलेली आहे. सध्या बाजरी पिकाचे तण काढण्याचे काम सुरू असून अनेक महिलांना यातून रोजगार उपलब्ध झालेला आहे.
पीक कापणीची तपासणी
* हातात कणीस घेतले असता त्यातून दाणे सुटणे तसेच दाताखाली दाणा चावल्यानंतर कट्ट असा आवाज आल्यास पीक कापणीस योग्य आहे असे समजावे.
* ताटाची कणसे विळ्याने कापून गोळा करुन वाळवून यंत्राने मळणी करावी. त्यानंतर धान्य पोत्या भरावे.
५ ते ६ पाणीपाळी आवश्यक
* उन्हाळी बाजरी पिकास ३५ ते ४० सें. मी. पाण्याची गरज असते. पेरणीनंतर ४ दिवसांनी हलके पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्या.
* पाण्याची उपलब्धता असल्यास संवेदनक्षम अवस्थेत पाणी दिल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी), दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी) आणि तिसरे पाणी दाणे भरते वेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.
* बाजरी पिकांसाठी दहा ते बारा दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. त्यानंतर पीक काढणीस येते.
आंतरमशागत व तण नियंत्रण गरजेचे
* तणांचा बंदोबस्त करण्यासाठी २ वेळा कोळपणी आणि गरजेनुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी. पेरणी केल्यापासून सुरुवातीचे ३० दिवस शेत तण विरहीत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
* कारण याच कालावधीत तण व पीक यांच्यात हवा, पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी स्पर्धा होत असते किंवा एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीमध्ये ॲट्राझिन तणनाशकाची १.० किलो प्रति हेक्टरी पेरणीनंतर परंतु पीक उगवण्यापूर्वी ५०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी व एक खुरपणी पेरणीनंतर २५-३० दिवसांच्या आत करावी.