उन्हाळ्यामध्ये बाजरी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. त्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करावे. खरीप हंगामातील बाजरी पिकापासून येणाऱ्या उत्पादनापेक्षा उन्हाळी बाजरी लागवडीच्या माध्यमातून चांगले उत्पादन मिळते.
महाराष्ट्रामध्ये खानदेश, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात उन्हाळी बाजरी घेतली जाते. उन्हाळ्यात हवामान कोरडे असल्याने अरगट, गोसावी, तांबेरा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे धान्य व चाऱ्याची गुणवत्ता चांगली मिळते. या लेखात आपण उन्हाळी बाजरी लागवड विषयी माहिती घेऊ. जमिनीची निवड
उन्हाळी बाजरीसाठी शक्यतो सपाट, मध्यम आणि भारी व ६.२ ते ८ सामू असणारी जमीन निवडावी. बाजरीची लागवड करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. दुसरी पाळी देण्या अगोदर चांगले कुजलेले चार ते पाच टन हेक्टरी शेणखत वापरावे.
बाजरीचे संकरित वाण
उन्हाळी बाजरी फुलोरा येण्याच्या कालावधीमध्ये वाऱ्याचा वेग व तापमान जास्त असल्याने काही वानांमध्ये परागीकरणला अडचण येते. कणसात दाणे कमी भरतात. श्रद्धा, सबुरी असे अधिक उत्पादन देणारे तसेच केसाळ प्रकारातील अतिशय घट्ट कणिसअसणारे वाण निवडल्यास पक्षांचा त्रासही कमी होतो.
प्रोअॅग्रो ९४४४ व ८६ एम ६४ या संकरित वाणांची लागवड करावी. कारण हे वाण जास्त उत्पादन (धान्य आणि चारा) देणारे असून केवडा रोगास प्रतिकारक्षम आहेत. तर सुधारित वाणामध्ये धनशक्ती (आय.सी.टी.पी ८२o३, लोह १o-२) व आय.सी.एम.व्ही. २२१, डब्ल्यू सी सी ७५ इत्यादी वाण लागवडीसाठी उपयुक्त आहेत.
उन्हाळ बाजरी लागवड पद्धत
• संकरित बाजरीचे प्रमाणित बियाणे हेक्टरी चार ते पाच किलो वापरावे.• बाजरीची पेरणी करण्यापूर्वी प्रति दहा ते पंधरा किलो बियाण्यास २५० ग्रॅम ऍझोस्पिरीलम या जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.• शेत चांगले ओलून घ्यावे व वाफसा आल्यावर पेरणी करावी.• पेरणी करताना तीन ते चार सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल करू नये.• उन्हाळी बाजरीची पेरणी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ते फेब्रुवारी या दुसऱ्या पंधरवड्यात केल्यास फायदेशीर ठरते.• पेरणीस उशीर झाल्यास पीक वाना प्रमाणे ५० ते ५५ दिवसांनी फुलोऱ्यात येते. आशा वेळी तापमान ४२अंश सेंटिग्रेड पेक्षा अधिक असल्यास परागकण मरतात व उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.
बाजरी लागवडीचे अंतर
उन्हाळी बाजरी लागवड करताना दोन ओळींतील अंतर ३० ते ४० सेंटीमीटर व दोन रोपांतील अंतर १० ते १५ सेंटी मीटर ठेवावे. नंतर गरजेप्रमाणे विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.
आंतरमशागत
तणांचा बंदोबस्त करण्यासाठी २ वेळा कोळपण्या आणि गरजेनुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी. पेरणी केल्यापासून सुरुवातीचे ३० दिवस शेत तण विरहीत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण याच कालावधीत तण व पीक यांच्यात हवा, पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी स्पर्धा होत असते.
उन्हाळी बाजरीचे खत व्यवस्थापन
माती परीक्षण करून प्रति हेक्टरी ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद द्यावे. या मधील अर्धे नत्र पेरणीच्या वेळी व संपूर्ण स्फुरद, उर्वरित नत्र पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.
पाणी व्यवस्थापन
• जमिनीचा पोत नुसार १० ते १५ दिवसांनी पाणी द्यावे.• पहिले पाणी २० ते २५ दिवसांनंतर फुटवे येण्याच्या वेळी द्यावे.• दुसरे पाणी ३० ते ४५ दिवसांनी पीक पोटरीत असताना द्यावे.• दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी कणसात जेव्हा दाणे भरतात तेव्हा द्यावे.• पाण्याची दुसरी पाळी अगोदर पिकास हलकीशी भर दिल्यास जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते व पीक जास्त वाऱ्यावर लोळत नाही.
अशा प्रकारे योग्य नियोजन करून उन्हाळी बाजरी पिकांतून अधिकाधिक उत्पादन सहज मिळविता येते.
डॉ. गणेश कपूरचंद बहुरे प्राचार्य, कृषि महाविद्यालय खंडाळा ता. वैजापुर जि. छ. संभाजीनगर मो. नं. ८२७५३२१६०७.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात