राज्यातील वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी राज्यामध्ये मोठया प्रमाणात बांबू लागवडीस प्रोत्साहन देवून शेतकऱ्यांना बांबू लागवडीस उद्युक्त करण्यासाठी तसेच, केलेल्या बांबू लागवडीचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने टास्क फोर्स गठीत केली आहे.
दोन्ही उपमुख्यमंत्री या टास्क फोर्सचे उपाध्यक्ष असणार आहे. राज्यामध्ये बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्याबाबत टास्क फोर्स विचार करील व एक कालबध्द कार्यक्रम तयार करून त्याची संबंधित यंत्रणांमार्फत अंमलबजावणी करून घेईल.
वातावरणीय बदलामुळे कोरडवाहू शेती धोक्यात आली असून पिकांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. विदर्भ व मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये वारंवार पडणारा दुष्काळ व अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
बांबू हे पिक कमी पाणी वापरणारे तसेच जास्त प्रमाणात कार्बन शोषून घेणारे (Carbon Sequestration) असल्यामुळे पर्यावरणस्नेही असून त्याची राज्यभरात लागवड केल्यास वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देण्याबरोबरच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होणार आहे. त्यामुळेच आगामी काळात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ही टास्क फोर्स कार्यरत राहणार आहे.
सदर टास्क फोर्सच्या बैठकीसाठी निमंत्रित म्हणून आवश्यकतेनुसार विविध अशासकीय संस्था, कंपन्या यांच्या प्रतिनिधींना तसेच तज्ज्ञ व्यक्तींना बोलविले जाणार असून, टास्क फोर्सची बैठक तीन महिन्यातून किमान एकदा आयोजित करण्यात येणार आहे.