पिकांवरील रोगांना कारणीभूत असलेल्या बऱ्याच सूक्ष्मजिवांचा प्रसार बियाण्याद्वारे होत असतो. जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची सशक्त व जोमदार वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी न चुकता बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे.
कृषी उत्पादनामध्ये हमखास वाढ करणाऱ्या या कमी खर्चाच्या साधनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही निश्चित वाढ होईल. पीक संरक्षणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रणाचे उपाय केल्यापेक्षा रोगाचा प्रादुर्भाव होण्याआधीच बीजप्रक्रियेद्वारे पूर्व नियंत्रणाचे उपाय योजणे फायद्याचे आणि कमी खर्चाचे ठरतात.
बीजप्रक्रियेमध्ये घ्यावयाची काळजी
१) बियाण्यास प्रथम रासायनिक औषधांची बीजप्रक्रिया करावी व त्यानंतर जैविक घटकांची बीजप्रक्रिया करावी.
२) बियाणे भांड्यात/ताडपत्रीवर घेऊन त्यावर दिलेल्या प्रमाणात रासायनिक बुरशीनाशक टाकून खाली-वर करावे व संपूर्ण बियाण्यास चोळावे जेणेकरून बियाण्यावर बुरशीनाशकाचा सारखा थर बसेल.
३) बीजप्रक्रियेसाठी वापरावयाची औषधे सर्व बियाण्यास दिलेल्या प्रमाणात सारखी लागतील याची काळजी घ्यावी. ती कमी झाल्यास रोगापासून पुरेसे संरक्षण मिळत नाही व जास्त झाल्यास बियाण्याला अपाय होतो.
४) रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करताना हातात रबरी/प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत, डोळ्यांना चष्मा व नाकाला रुमाल बांधावा, शरीरास इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
५) प्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद डब्यात किंवा प्लॅस्टिक पिशवीत भरू नये. त्यापूर्वी असे बियाणे थंड व कोरड्या हवेत सावलीत २४ ते ४८ तास वाळवावे.
६) प्रक्रिया केलेले बियाणे थंड कोरड्या जागेत सावलीत ठेवून वाळवून पेरावे.
७) बीजप्रक्रियेसाठी ड्रम वापरावा, तो उपलब्ध नसेल तर मडक्यात योग्य प्रमाणात बियाणे व औषध घालून मडक्याचे तोंड फडक्याने बांधावे व मडके तिरके, उभे, आडवे, सुलटे असे काही काळ हलवावे म्हणजे सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात औषध लागेल.
८) बीजप्रक्रिया केलेले बियाणे विषारी असल्याने ते खाल्ले जाणार नाही याची काळजी घ्यावी.
जैविक घटकाची बीजप्रक्रिया
१) जैविक घटकाची बीजप्रक्रिया करताना २५० ग्रॅम जिवाणू संवर्धनाचे पाकीट १० ते १५ किलो बियाण्यास वापरावे.
२) एक लीटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ टाकून द्रावण उकळून घ्यावे.
३) द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये २५० ग्रॅम जिवाणू संवर्धक टाकून बियाण्यास हळुवारपणे लावावे.
४) बियाणे ओलसर करून जिवाणू संवर्धन सारख्या प्रमाणात बियाण्याला लावावे.
५) नंतर बियाणे सावलीत वाळवावे व लगेच पेरणी करावी.
वरील सर्व उपाययोजना शेतकऱ्यांनी योग्यरीत्या केल्यास बुरशीजन्य मर तसेच इतर रोगापासून बियाणांचे संरक्षण होऊन उत्पादनात भरघोस वाढ होते.
अधिक वाचा: कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी निंबोळी पेंडीवर मेटॅऱ्हाझीयम व ट्रायकोडर्मा बुरशी कशी वाढवावी