बियांचा सर्वाधिक वापर माणूस खाण्यासाठी करतो. त्यासाठी त्याच बिया पेरतो म्हणजेच शेती करतो. अन्नाची दैनंदिन अनिवार्यता लक्षात घेतली तर बियांचा आणि आपला संबंध रोजच्या रोज येतो. त्यामुळे बिया साधारण, सामान्य गोष्ट आहे असे वाटू लागते, दुर्लक्ष होते व अवमूल्यनही होते.
ए आय कृत्रिम बुद्धीमत्तेच्या प्रभावाचा हा काळ आहे. त्या पार्श्वभूमीवर अनुभवाचे, स्वयंभू घटनांचे महत्त्वही ठळक होणार आहे-होते आहे. 'बी' ही अशी स्वयंभू गोष्ट आहे की जीची जादू कितीही लक्षात आली तरी कॉपी-पेस्ट करता येण्यासारखी नाही. 'बी'च्या या जादूई कारागिरीकडे लक्ष वेधण्याचा कल्पक प्रयत्न म्हणजे बीजराख्या होय.
बीजराखीचा मुख्य उपयोग पेरण्यासाठी असतो. हा उपयोग ज्या व्यापक घटनेचा भाग असतो ती घटना म्हणजे 'बियांचे सौंदर्य अनुभवणे। सौंदर्य म्हटले की रंग, रूप, आकार या दृष्टीकोनापासून ते 'सत्यम् शिवम् सुंदरम्।' या व्याख्येपर्यंत त्याचा विस्तार शक्य असतो.
बियांच्या राख्या डिझाईन करताना ‘बी’चा आकार, रंग हे लक्षात घेऊन धाग्यांचे रंग, त्यांची गुंफण ठरवावी लागते. या प्रक्रियेत बिया हाताळल्या जातात, आवरणाच्या वैशिष्ट्यांचे निरीक्षण घडते; बीच्या रंग-रूपाच्या सौंदर्याचा अनुभव येतो.
यापूर्वी बियांचे संकलन करण्याची पायरी असते. येथे वनस्पतीचा परिचय, फुलणे-फळणे, या घटनांचा काळ लक्षात घेणे वगैरे विकास प्रक्रियेतील सौंदर्याचा अनुभव घेणे शक्य असते.
बीजराखी निर्मितीतील या घटनांचा आम्ही सलग ५ वर्षे अनुभव घेत आहे. ही मजा इतरांनाही अनुभवली पाहिजे असे वाढून बीजराखी निर्मिती स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यातही 'तेलबिया' वापरून बीजराख्या कराव्यात सांगितल्याने दैनंदिन आहारातील बियांचा सजग परिचय होणार आहे.
आमच्या बीजराख्या खरेदी करणारे दोन प्रकारचे ग्राहक आहेत १) पुनर्विक्रीसाठी २) वैयक्तिक वापरासाठी खरेदी करणारे. पुनर्विक्रीसाठी राख्या घेणारा प्रयत्नपूर्वक बिया ओळखायला शिकतो. यातून त्याचा आणि ' बी'चा परिचय प्रस्थापित होतो. राखी खरेदी करताना स्वाभाविकपणे ‘बी 'चे निरीक्षण घडते.
राखी बांधताना बहीण-भावांच्या संवादात 'बी'कडे लक्ष जाण्याची शक्यताही अधिक असते. केवळ या घटनांमधून नकळतपणे 'बी' चे सौदर्य ग्रहण होते. त्यासाठी आम्ही सगळ्या बीजराख्यांच्या केंद्रस्थानी जाणीवपूर्वक बी ठेवतो.
जे उत्साहाने बीजराखी पेरतात, संयमाने त्यांच्या वाढीच्या क्रियेत लक्ष घालतात ते बीच्या सृजनशक्तीच्या सौंदर्याचा अनुभव घेतात. अशा व्यक्तींची संख्या निश्चितच कमी-नगण्य असणार याचा अनुमान शेतीतून झपाट्याने माणसे कमी होण्यास भाग पाडणाऱ्या सामाजिक मानसिकतेवरुन बांधता येतो.
बियांना छेद करून, तारांमध्ये गुंफून वैजयंती, कर्दळी, गुंजा वगैरे बियांच्या राख्याही आम्ही करतो. सच्छिद्र बियांच्या राख्या पेरण्यासाठी वापरता येत नाहीत तरी प्रचलित राख्यांना पर्यावरण स्नेही पर्याय त्या देतात.
समस्या सोडविण्याच्या कामी बियांचे रक्षक सौंदर्य अनुभवण्याची संधी घेणे बाकी आहे. त्यासाठी बीजराखी निर्मिती-वापर याद्वारे बियांसोबत परिचय करून सौंदर्य अनुभूतीची सुरुवात तर करूया.
शेतकरी प्रांजली बोरसे
यज्ञांग सत्यग्राही शेती, नांद्रे, धुळे
7744895285