मानवाच्या दैनंदिन आहारात भाजीपाल्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. भाजीपाल्यापासुन शरीराला अत्यावश्यक अशी पोषक द्रव्ये मिळतात. परंतू वाढती लोकसंख्या लक्षात घेता भाजीपाल्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यासाठी भाजीपाला उत्पादनाचे नवीन विकसीत तंत्रज्ञान वापरुन त्यांचे उत्पादन वाढविणे आज काळाची गरज आहे. आधुनिक शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. त्या आधुनिक शेतीचा महत्वाचा भाग म्हणजे संजीवके व पीकवृध्दी नियंत्रके यांचा वापर हे होय.
भाजीपाला उत्पादनात निरनिराळ्या वनस्पती शरीरक्रियांचा सहभाग असतो. त्या क्रिया घडवुन आणण्यात विविध रासायनिक घटक कारणीभुत ठरतात.
वनस्पतींमध्ये नैसर्गिकरीत्या घडून येणाऱ्या या प्रक्रियांना गती देण्याचे किंवा नैसर्गिक स्थिती असतांना अशा क्रिया घडवुन आणुन आवश्यक तो परिणाम साधण्याचे काम ठराविक वेळी, ठराविक प्रमाणात वेगवेगळ्या संजीवकाचा वापर प्रामुख्याने होतो.
संजीवकांचा वापर कुठे होतो?
१) बियाण्याची उगवणशक्ती वाढविणे.
२) पिकाची जोमदार वाढ करणे.
३) फुलांची व फळांची गळ थांबविणे.
४) मादी फुलांचे प्रमाण वाढविणे.
५) फळधारणा होण्यास मदत करणे.
६) फळे एकसारखी पिकविणे.
७) फळांचा आणि भाजीपाल्याचा टिकाऊपणा वाढविणे.
८) शेंडेवाढ.
९) लवकर फुल येणे.
इत्यादी बाबींसाठी करता येतो. ही संजीवके बाजारात विविध अनेक स्वरुपात उपलब्ध आहेत, त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास नक्कीच उत्पादनात वाढ होऊ शकते.
कसा करावा वापर?
१) बियाण्यावर प्रक्रिया
पेरणीपूर्वी बियाणे योग्य त्या तीव्रतेच्या संजीवकाच्या द्रावणात भिजवून सुकवून बियाण्याची पेरणी करावी.
२) रोपांची मुळे बुडविणे
संजीवकाच्या आवश्यक त्या तीव्रतेचे द्रावण तयार करुन रोपांची पुर्नलागवड करण्यापूर्वी मुळे संजीवकांच्या द्रावणात बुडवून लागवड करावी.
३) पानांवर किंवा फळांवर फवारणी
संजीवकाचे द्रावण तयार करुन शिफारशीप्रमाणे योग्य तीव्रतेच्या द्रावणाची योग्य वेळी पानांवर किंवा फळांवर फवारणी करावी.
४) संजीवकाचे द्रावण तयार करुन जमिनीतून देणे
संजीवकाचे योग्य तीव्रतेचे द्रावण तयार करुन ते रोपांच्या मुळाशी जमिनीत द्यावे.
अधिक वाचा: कमी पाण्यावर ९० दिवसात तयार होणारे हे कडधान्य पिक ठरतंय फायदेशीर