जगाला लागणाऱ्या सर्व कृषिमालाचे उत्पादन भारतात होते. भारतातून १७० देशांना विविध प्रकारचा कृषि माल निर्यात केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने फळे, फुले व भाजीपाला या पिकांचा समावेश होतो.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून जागतिक व स्थानिक ग्राहकामध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे कृषि मालाच्या गुणवत्ते बरोबरच अन्नाच्या सुरक्षिततेबाबत ग्राहकांना हमी देणे आवश्यक झालेले आहे. येथून पुढे गुणवत्तेची हमी देण्याकरीता खालील बाबींवर विशेष भर द्यावा लागणार आहे.
लागवडीपूर्वीची काळजी
पिकांची लागवड बियांपासून करत असल्यामुळे, लागवडीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डॅझीम ३ ग्रॅम प्रती किलो या प्रमाणात घेऊन बियाण्यास बीजप्रक्रिया करावी
२) तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, इ. पिकांची लागवड रोपे तयार करून पुनर्लागवड पद्धतीने करत असल्यामुळे लागवडीपूर्वी रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावीत म्हणजे लागवडीनंतर जमिनीतील बुरशी किंवा किडीमुळे रोपावर प्रादुर्भाव होणार नाही. त्यासाठी, डायथेन एम-४५ २५ ग्रॅम + कार्बेन्डॅझीम किंवा इमिडाक्लोप्रीड १० मिली + १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन रोपे त्यामध्ये बुडवून रोपांची पुनर्लागवड करावी.
लागवडीनंतरची काळजी
भाजीपाला पिकांमध्ये सुरुवातीला रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामध्ये मावा, पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे व तसेच कोळी या किडींचा अंतरभाव होतो. ज्या भाजीपाला पिकांची रोपांपासून पुर्नलागवड करावयाची असेल उदा. त्यामध्ये मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी/फ्लॉवर इ. पिकांची चांगली काळजी घ्यावी लागते.
कारण या पिकांवर सुरुवातीलाच जर रस शोषणाऱ्या किडींचे नियंत्रण झाले नाही तर पुढे विषाणूजन्य, जीवाणूजन्य रोगांचा फैलाव होऊ शकतो. म्हणून या रस शोषणाऱ्या किडींचे रोपवाटीकेपासून व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पुढे बहुतेक भाजीपाला पिकांमध्ये पाने पोखरणारी अळी (नागअळी), शेंडा व फळ पोखरणारी अळी, रोपे/देठ कुरतडणारी अळी, फळमाशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा आराखडा आखून नियंत्रण करणे महत्वाचे आहे. या पद्धतीमध्ये मशागतीय, यांत्रिक, भौतिक, जैविक व गरजेनुसार रासायनिक पध्दतींचा एकंदरीत सुसंगतपणे वापर करावा.
पिक संरक्षणासाठी महत्वाच्या बाबी
१) पिकावरील किडी व रोगाचे नियंत्रण करण्याकरीता शिफारस केलेल्या औषधांचाच (कीटकनाशके/बुरशीनाशके) वापर करण्यात यावा.
२) वापरास बंदी घातलेल्या औषधांचा वापर करू नये.
३) औषधांची फवारणी शिफारस केलेल्या मात्रेत व योग्यवेळी व योग्य प्रमाणात करावी.
४) युरोपियन कमिशन/कोडेक्स कमिशन यांनी निर्धारीत केलेल्या मर्यादेच्या आत उर्वरीत अंशाचे प्रमाण असणे आवश्यक आहे त्यामुळे औषधांची फवारणी प्रशिक्षीत व्यक्तिद्वारे व योग्य त्या मात्रेत करावी.
५) वापर करण्यात आलेल्या औषधांचा तपशील ठेवावा.
६) फळाची काढणी व अंतिम फवारणीमध्ये किती अंतर ठेवले होते याचा तपशील ठेवावा.
अधिक वाचा: हरभरा पिकात तुषार सिंचनाने पाणी देण्यामुळे कसे होतात फायदे वाचा सविस्तर