ताज्या भाज्या आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थाच्या निर्यातीसाठी असणारी बाजारपेठ ही फार मोठी असून आज होत असलेल्या निर्यातीच्या पाचपट निर्यात करण्यास वाव आहे.
निर्यात होणाऱ्या भाज्यांमध्ये बटाटा, लसूण, कांदा, काकडी, हिरवी मिरची, मुळा, भोपळा, कारले, भेंडी, कोबी व फ्लॉवर यांचा समावेश होतो. भाज्या आयात करणाऱ्या देशांमध्ये युरोपातील देश, सौदी अरेबिया, कुवेत, इराक आणि आखाती देशांचा समावेश होतो.
भाजीपाला निर्यातीसाठी वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मापदंड आहेत. कोणत्या देशाला आपण भाजीपाला निर्यात करणार आहे त्यानुसार प्रत्येक भाजीपाला पिकांच्या वाणांची तसेच मापदंडाची निवड करावी.
निर्यातीसाठी विविध भाजीपाला पिकांची गुणवत्ता मानके
१) भेंडी
फळे नाजूक व रंग हिरवा, कोवळी लुसलुशीत ६ ते ७ सें.मी. लांब, साठवणीस योग्य, एकसारख्या आकाराची, डागविरहित, कोणत्याही प्रकारची इजा झालेली नसावी.
२) मिरची
गर्द हिरव्या रंगाची, तिखट, साठवणीस योग्य, फळाचा आकार एकसारखा असावा. मिरची ६ ते ७ सें.मी. लांब असावी.
३) कारले
रंग हिरवा, २५ ते ३० सें.मी. लांबीची असावी. मान बारीक असावी. हिरवी काटेरी असल्यास अधिक चांगले.
४) गवार
हिरव्या रंगाची ७ ते १० सें.मी. लांब असावी आणि कोवळी लुसलुशीत असावी. बी धरलेली असू नये.
५) दुधी भोपळा
२५ ते ३० सें.मी. लांबीचा, दंड गोलाकार, ड्रमच्या आकाराचा आणि फिकट हिरव्या रंगाचा असावा.
६) टोमॅटो
गोल, मध्यम आकाराचे अगर अंडाकृती असावे. रंगाने लालसर, पूर्ण पिकण्याच्या अगोदरची अवस्था, तसेच वरची साल सुरकुतलेली नसावी तर तजेलदार आकर्षक असावी. टोमॅटोचे फळ डागविरहित असावे.
७) कांदा
दोन प्रकारचा निर्यात करू शकतो. एक मोठा कांदा आणि लहान कांदा. मोठ्या कांद्याचा आकार ४ ते ६ सें.मी. असावा. गडद ते फिकट लाल रंग, गोलाकार, तिखट आणि अगदी लहान कांद्यास म्हणजे २ ते ३ सें.मी. आकार लाल रंगाच्या गोलाकार कांद्यास खूप देशांतून मागणी आहे.
८) लसूण
गोलाकार, पांढऱ्या रंगाचा ५ सें.मी. व्यासापेक्षा मोठा आकार, मोठी पाकळी, एका गड्ड्यात १० ते १५ पाकळ्या असाव्यात.
९) बटाटा
४.५ ते ६.० सें.मी. आकाराचा पांढरट अंडाकृती असावा. वरची साल आकर्षक असावी.
१०) शेवगा
शेंगा ५० ते ६० सें.मी. लांबीच्या व गरयुक्त असाव्यात तसेच एकसारख्या जाडीच्या आणि लांबीच्या असाव्यात.
११) कलिंगड
२ ते ३ किलो वजनाची असावीत. आतला गर लाल असावा. कलिंगड कमी बियांचे असावे.
अधिक वाचा: Karale Lagwad : कारले लागवडीचे नियोजन करताय कोणते वाण निवडाल अन् कशी कराल लागवड