भातावरील किडी दरवर्षी सातत्याने येणाऱ्या असल्यामुळे पीक संरक्षण अत्यंत महत्वाचे आहे. किडींचे प्रभावी एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कशा कराव्यात.
महाराष्ट्रामध्ये गादमाशीचा उपद्रव प्रामुख्याने सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात आढळून येतो.
ओळखण्याच्या खुणा
- गादमाशीला लांब पाय असून तीचा आकार डासासारखा असतो.
- या किडीची मादी तांबूस रंगाची असते, तर नर पिवळट करड्या रंगाचा असतो.
- किडीची अळी पाय विरहित व गडद तांबूस रंगाची असते.
नुकसानीचा प्रकार
- अंड्यातून बाहेर पडलेली अळी रोपाच्या खोडात शिरून त्यामध्ये असलेले कोवळे अंकुर कुरतडून खाते.
- अंकुर कुरतडताना तिच्या तोंडातून लाळ बाहेर पडते. त्या लाळेत सिसिडोजन नावाचे द्रव्य असते.
- सिसिडोजनची कुरतडलेल्या अंकुरावरती प्रक्रिया होते व त्यामुळे अळीच्या भोवतालचा अंकुराचा भाग फुगतो व त्याची कांद्याच्या पातीसारखी नळी तयार होते.
- ही नळी पिवळसर पांढरट किंवा चंदेरी रंगाची असते.
- त्यालाच नळ किंवा गाद किंवा पोंगा असे म्हटले जाते. अशा अंकुराला लोंब्या येत नाहीत.
- पीक फुटव्याच्या अवस्थेत असताना गादमाशीचा उपद्रव जास्तीत जास्त असतो. कीडग्रस्त रोपाला अनेक फुटवे येतात परंतु ते खुरटे राहतात.
किडीच्या वाढीस पोषक वातावरण
हवेतील ८० टक्क्यापेक्षा जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, घट्ट लागवड, २८° से. ते ३३° से. तापमान या किडीच्या वाढीस पोषक असते.
एकात्मिक व्यवस्थापन
१) भात पिकाची लागवड शक्यतो एकाच वेळी करावी.
२) खतांचा संतुलित वापर करावा.
३) बिगर हंगामात शेतात वाढणाऱ्या तणंचा जाळून नाश करावा. कारण या गवतावर ही किड वाढते.
४) लागवडीनंतर २० दिवसांनी किंवा एक चंदेरी पोंगा प्रति चौ.मी. आढळल्यास दाणेदार ४ टक्के कारटॅप हायड्रोक्लोराईड २५ किलो किंवा ०.३ टक्के फिप्रोनील १८.५० किलो प्रति हेक्टरी जमिनीत टाकावे.
५) फवारणीसाठी लम्ब्डा सायहॅलोथ्रीन २.५ टक्के प्रवाही ५०० मिली किंवा फिप्रोनील ५ टक्के प्रवाही १००० मिली किंवा थायोमिथॉझॉन २५ टक्के ५०० ग्रॅम प्रति ५०० लि/ हेक्टर या प्रमाणात फवारावे.
६) कीडग्रस्त रोपे किंवा चंदेरी पोंगे उपटून जाळुन टाकावेत.
७) लागवडीपूर्वी रोपाची मुळे क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही प्रति लिटर १ मि.ली. च्या द्रावणात १२ तास बुडवावीत किंवा वरील द्रावणात १ टक्का युरिया मिसळून रोपांची मुळे ३ तास बुडवुन ठेवावीत.
अधिक वाचा: भात खाचरे वाळली ह्या किडीचा वाढतोय प्रादुर्भाव कसे कराल नियंत्रण