कोकणातीलभातपिकावर करपा, कडा करपा, शेंडे करपा (पर्ण करपा), पर्णकोष करपा, आभासय काजळी, उदबत्ता व तपकिरी ठिपके हे रोग प्रामुख्याने आढळतात.
भातावरील करपा, शेंडे करपा (पूर्ण करपा), पर्णकोष करपा, आभासमय काजळी, उदबत्ता व तपकिरी ठिपके हे रोग बुरशीजन्य असून, कडा करपा हा रोग जीवाणूजन्य आहे. करपा हा रोग पायरीक्लुलेरिया-ग्रीसी नावाच्या बुरशीमुळे होतो.
या रोगाची लक्षणे पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थेमध्ये म्हणजेच रोपवाटिकेत फुटवे येण्यावेळी, दाण्यावरही आढळतात. रोपवाटिकेत भात बियाण्याची पेरणी केल्यावर रुजून आलेल्या रोपांवर या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
रोगाची लक्षणे
१) प्रथमतः रोपांच्या पानावर जांभळ्या रंगाचे ठिपके निर्माण होऊन पाने वाळतात व रोपे मरतात.
२) पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी रोपांची लावणी करताना रोगग्रस्त रोपांची लावणी केल्यास हा रोग शेतात फैलावतो.
३) लावणीनंतर या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.
४) सुरुवातीला आकाराने छोट्या असलेल्या ठिपक्यांचे आकारमान वाढत जाऊन ते मोठे होतात.
५) हे ठिपके दोन्ही बाजूला वाढतात. पिकाच्या वाढीच्या पुढच्या अवस्थेत म्हणजेच दाणे भरण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव होतो.
६) रोगग्रस्त दाण्यावर काळपट रंगाचे ठिपके दिसून येतात. यामुळे दाणे निमुळते होऊन मध्यभागी फुगीर होतात. त्यांच्या कडा जांभळट रंगाच्या असून मध्यभाग करड्या रंगाचा असतो.
७) रोगकारक बुरशीची बीजे निर्माण झाल्यावर ठिपक्यांचा मध्यभाग राखाडी रंगाचा होतो.
८) पानावर निर्माण झालेली बुरशी बीजे पाऊस व वाऱ्यामार्फत शेतात सर्वत्र पसरतात व भात खाचरातील सर्व रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव होतो.
९) ढगाळ वातावरण व अधूनमधून पडणारा पाऊस रोगनिर्मिती व प्रसारास मदत करतात.
१०) रोपांच्या पानांवर असे अनेक ठिपके तयार होऊन पाने करपतात, रोपांची वाढ खुंटते.
११) या रोगाचा प्रादुर्भाव लोंबी येण्याच्या वेळी झाल्यास लोंबीच्या देठावर बुरशीची वाढ होऊन तो भाग काळा पडतो व कुजतो. देठ कुजलेल्या ठिकाणीच लोंबी मोडते, दाणे पोचट होतात.
फवारणी गरजेची
करपा रोग व्यवस्थापनासाठी ट्रायसायक्लॅझोल (७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) १० लिटर पाण्यात १० ग्रॅम किंवा आयसोप्रोथिऑलेन दहा लिटर पाण्यात दहा मिली यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. पहिली फवारणी रोगाची लक्षणे दिसून येताच घ्यावी व पुढील दोन फवारण्या २१ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.