खोड कीड ही भात पिकावरील एक मुख्य कीड असून तिचे वेळीच नियंत्रण केले पाहिजे. सध्या तालुक्यात उष्ण व दमट हवामान असल्याने काही किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते.
खोडकिडा म्हणजे काय?
ही कीड शेतीमध्येच राहते. भातपीक कापणीनंतर हा किडा कोषावस्थेत राहतो. दुसऱ्या वर्षाच्या पेरणीनंतर पोषक वातावरण मिळाल्यानंतर यामधून पतंग बाहेर पडून दीडशे ते दोनशे अंडी घालते. अळ्या तयार झाल्यानंतर भाताच्या खोडात जाऊन कोंब खाण्यास सुरुवात करतात. भात वाढीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास भातामधील पाते पिवळे, लालसर होऊन त्यांची सुरळी होते, याचा भात पिकावर परिणाम होतो.
नुकसान करण्याची पद्धत
- या किडीची अळी सुरूवातीस काही वेळ कोवळ्या पानांवर आपली उपजीविका करते.
- नंतर ती खाली येऊन खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते व आतील भाग पोखरून खाते.
- किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजेच फुटवे येण्याच्या अवस्थेत किंवा पीक पोटरीवर येण्यापूर्वी झाला तर रोपाचा मधला पोंगा लालसर पिवळा पडून वरून खाली सुकत येतो, यालाच "गाभामर" असे म्हणतात.
- पोटरीतील पिकावर देखील खोडकीडीचा उपद्रव आढळून येतो आणि त्यामुळे दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात यालाच पळींज किंवा पांढरी पिशी असे म्हणतात. परिणामतः भाताच्या उत्पादनात घट येते असते असे त्यांनी सांगितले.
प्रतिबंध कसा करणार?
- पिकाची वरचेवर पाहणी करून कीड ग्रस्त फुटवे काढून नष्ट करावेत. हे काम हंगामातून तीन ते चार वेळा करावे. शेतात पक्षी थांबे लावावेत.
- या किडींच्या व्यवस्थापनाकरिता क्विनॉलफॉस २ मिलि प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा फिप्रोनील ०.३ टक्के प्रतिगुंठा या प्रमाणात जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना वाळूमध्ये किंवा युरिया खतामध्ये मिश्रण करून भात शेतीमध्ये वापरावे.