महाराष्ट्रामध्ये भेंडीचे पीक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते, परंतु जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. भेंडीचे पीक वर्षभर घेतले जाते. बारमाही भेंडी लागवडीतून उत्पन्न मिळविणारे शेतकरी आहेत.
विविध वाण
अधिक उत्पादनासाठी कोकण कृषी विद्यापीठाने कोकण भेंडी, परभणी क्रांती, अर्का अनामिका, अर्का अभय, पंजाब-७, वर्षा उपहार, परभणी भेंडी, फुले विमुक्ता या सुधारित जातीची शिफारस केली आहे.
जमीन व हवामान
या पिकाला उष्ण हवामान चांगले मानवते. हलक्या जमिनीपासून ते काळ्या जमिनीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये पुरेसे सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. पाण्याचा निचरा होईल या पद्धतीने लागवड करणे आवश्यक आहे.
लागवड कशी करावी?
खरीप हंगामात जून-जुलैमध्ये, रब्बी हंगामात ऑक्टोबर-नोव्हेंबर तर उन्हाळी हंगामात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लागवड करावी. खरिपात भेंडीची लागवड ६० बाय ६० सेंटिमीटर अंतरावर, तर उन्हाळ्यात ४५ बाय १५ सेंटिमीटर अंतरावर करावी. त्यासाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे. खरिपात हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे पुरेसे होते. बी रुजत घालण्यापूर्वी पाण्यात किंवा सायकोसीलच्या (१०० मि. ली. प्रती लिटर) द्रावणात २४ तास भिजवावे. नंतर बियाणे काढून सावलीत कोरडे करून पेरावे. यामुळे उत्पन्न १० ते १५ टक्के वाढते.
खत व्यवस्थापन
भेंडीच्या पिकाला हेक्टरी १५ टन शेणखत, १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, पालाश व एक तृतीयांश नत्र यांची मात्रा द्यावी. उरलेले दोन तृतीयांश नत्र समप्रमाणात लागवडीनंतर ३० ते ६० दिवसांनी द्यावे.
आंतरमशागत
दोन ते तीन आठवड्यांनी रोपांची विरळणी करावी. यावेळी खुरपणी करून तण काढावे, साधारणतः दोन ते तीन खुरपण्या कराव्या लागतात. तणनाशकाचा वापर करूनही तणाचे नियंत्रण करता येते.
काढणी
भेंडीची काढणी फळे कोवळी असताना करावी. झाडाला फुले येण्यास सुरुवात झाल्यानंतर सहा ते सात दिवसांत फळे काढणीसाठी तयार होतात, जातीपरत्वे १०० ते १२० क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते. योग्य, नियोजनबद्ध लागवड, तसेच खत व पाणी व्यवस्थापन उत्कृष्टरीत्या केल्यास भेंडीचे चांगले उत्पन्न मिळते. भेंडीला मागणी चांगली असते, शिवाय दरही चांगला मिळतो
कीड-रोगाचे नियंत्रण
भेंडी पिकावर भुरी रोग, हळद्या रोग (यलो व्हेन मोझॅक), पानांवरील ठिपके, तुडतुडे, शेंडा व फळे पोखरणारी अळी, मावा या प्रकारच्या कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकाचे वेळच्या वेळी निरीक्षण करून कीडरोग जाणवल्यास कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने उपाय योजना कराव्यात. आवश्यक त्या वेळी प्रकाश सापळा किंवा गंध सापळ्याचा वापर करणे फायदेशीर ठरेल.
अधिक वाचा: Vatana Lagwad : रब्बी हंगामात वाटाणा पिक घेताय कोणते वाण निवडाल