कोकणात खरीप हंगामासह रब्बी हंगामातही भुईमूग लागवड करता येते. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुधारित वाण/जातींचा वापर करण्याची शिफारस केली आहे.
विद्यापीठाने कोकण गौरव, कोकण ट्रॉम्बे टपोरा, कोकण भूरत्न या जाती विकसित करून प्रसारित केल्या आहेत. कोकणामध्ये या जाती खरीप, तसेच रब्बी-उन्हाळी हंगामात लागवडीसाठी योग्य आहेत.
पेरणीपूर्वी जमीन सपाट करून घ्यावी. आवश्यकता वाटल्यास पाण्याची एक पाळी द्यावी. पेरणी टोकन पद्धतीने करावी. उपट्या जातीची पेरणी दोन ओळीत ३० सेंटीमीटर अंतर ठेवून करावी.
निमपसऱ्या व पसऱ्या जातींसाठी दोन ओळींतील अंतर ४५ सेंटीमीटर ठेवावे. दोन रोपांतील अंतर १० ते १५ सेंटीमीटर ठेवावे. रब्बी हंगामात या पिकाची पेरणी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी.
कोकणात भुईमूगापासून अधिक उत्पादन आणि नफा मिळविण्यासाठी पिकाची लागवड रुंद वाफा व सरीवर ८० सेंटीमीटर बाय २० सेंटीमीटर अंतरावर करून सात मायक्रॉनजाडीचे पारदर्शक प्लास्टीकचे आच्छादन करावे.
पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी गरजेनुरूप एक खुरपणी करून नंतरच पिकाला स्वस्तिक अवजाराच्या साहाय्याने मातीची भर द्यावी.
त्यानंतर, १५ दिवसांनी भर दिलेल्या भुईमुगाच्या पिकावरून रिकामे पिंप फिरविल्यामुळे जमिनीत घुसणाऱ्या आऱ्यांची आणि परिणामतः शेंगांची संख्या वाढल्याने भुईमुगाचे उत्पन्न १० टक्के वाढते. शेंगा पक्व होताना शेंगांवरील शिरा स्पष्ट दिसतात तसेच टरफलाची आतील बाजू काळसर दिसू लागते.
प्लास्टिक आच्छादनरब्बी हंगामात डिसेंबर/जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमाण जास्त असते. भुईमूग उगविण्याच्या वेळी जमिनीचे तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तापमान खाली गेल्यास वाढ खुंटते. त्यामुळे ७ मायक्रॉन जाडीचे पारदर्शक प्लास्टीक आच्छादनाचा वापर करून पेरणी नोव्हेंबरमध्ये व काढणी मार्चअखेरपर्यंत करणे योग्य राहिल. आच्छादनामुळे वाढ चांगली व रोगाचे प्रमाण कमी होते.
अधिक वाचा: Suryful Lagwad : सुर्यफुल तेलास मोठी मागणी कशी कराल लागवड वाचा सविस्तर