मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करत उत्पादन घेतल्यानंतर, कमी उत्पन्न मिळत असल्याचा अनुभव पदरी पडल्यास, भुईमुगाची लागवडीपासून करण्यापासून शेतकरी बाजूला जात असल्याचे चित्र, प्रत्येक गावात कमी अधिक प्रमाणात भुईमुगाची लागवड होत आहे.
उत्तम व्यवस्थापन केल्यास भुईमुगाचे एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन होते. १०० किलो शेंगा फोडल्या तर ७० किलो शेंगदाणे मिळतात. त्या हिशेबाने एक एकर क्षेत्रात जवळपास दहा क्विंटल शेंगदाण्याचे उत्पादन मिळते.
प्रतिकिलोस १०० रुपये असा ठोक भाव धरल्यास प्रतिएकरी १ लाख रुपये मिळतात. ४० हजार रुपये उत्पादन खर्च वजा करता तीन महिन्यात ६० हजार रुपये नफा एका एकरात मिळतो.
भुईमुगाच्या शेंगा जमिनीत वाढत असल्याने जमीन सेंद्रिय पदार्थाने समृध्द, मध्यम भुसभुशीत असणे गरजेचे असते. या पिकाची आंतरमशागत पेरणीपासून तीस दिवसाच्या आतच झाली पाहिजे.
अन्यथा चाळीस दिवसांच्या पुढे त्याला आऱ्या सुटतात. आंतरमशागत करताना आऱ्यांना धक्का लागल्यास शेंगा कमी प्रमाणात लागतात. परिणामी उत्पादन कमी होते. बहुसंख्य शेतकरी या दोन प्रमुख बाबी लक्षात घेत नाहीत.
हलक्या व निकृष्ट जमिनीवर भुईमुगाचे पीक घेतले जाते. आंतरमशागतीसाठी योग्य कालावधीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अपेक्षित उत्पादन हातात येत नाही.
१२५ दिवसांत तयार होते पीक
भुईमूग हे खरिपात ही घेतले जाणारे महत्त्वाचे तेल बिया पीक आहे. महाराष्ट्रात जवळपास दोन लाख हेक्टर खरीप हंगामात हे पीक घेतले जाते. उपट्या जातीचा भुईमूग १०० ते १०५ दिवसात तर निमपसरी भुईमूग १२० ते १२५ दिवसांत तयार होणारे पीक आहे.
अशी घ्या पिकाची काळजी
- भुईमुगावर टिक्का हा रोग पडतो. पाने गुंडाळणारी अळी ही कीड पडते. टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब या बुरशीनाशक दोन ग्रॅम प्रतिलिटर पाणी अधिक कार्बेन्डाझिम हे बुरशीनाशक एक ग्रॅम प्रतिलिटर पाणी याची फवारणी घेतली तर रोग नियंत्रणात येतो.
- पाने गुंडाळणाऱ्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी क्लोरोपायरीफॉस अधिक सायफरमेथ्रीन असे संयुक्त कीटकनाशक एक मिलिमीटर प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारावे.
- भुईमुगाचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष उपाय म्हणून जिप्सम दोनशे किलो प्रतिएकर वापर करावा.
- शेंगदाण्यातील तेलाचे प्रमाण वाढवण्याबरोबर त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी केल्यास अपेक्षित परिणाम होतो.
अधिक वाचा: झेंडू पिकाचे शेतीमध्ये होणारे असंख्य फायदे माहिती आहेत का? वाचा सविस्तर