मानवाचा जंगलांमध्ये वाढता वावर, गुरे चराई व अतिक्रमण यामुळे बिबट्याचा मूळ अधिवास संपत आहे. पर्याय म्हणून त्याने चक्क उसाच्या फडातच बस्तान मांडले. प्रजननापासून ते थेट शिकारीपर्यंतच्या सर्व गोष्टी तो उसाच्या फडात करायला लागला. आता करायचे तरी काय?
कधीकाळी जंगलांमध्ये वावरणाऱ्या बिबट्याने आज स्वतःचा अधिवास धोक्यात आल्याने पर्याय म्हणून मनुष्यालगतच्या अधिवासात राहण्यासाठी अनुकूलन साधले, त्यामुळे मुंबई, नाशिकसारख्या विभागांतही त्याचा आज सहज वावर दिसतो.
पर्याय म्हणून स्वीकारला असला, तरी हा नवा अधिवास त्याच्यासाठीही जीवघेणा ठरत आहे. कालवे किंवा विहिरीत पडून मृत्यू रस्ते व रेल्वे अपघातात जीव जाणे, विजेचा धक्का, विषबाधा व शिकार यामुळे बिबट्यांचे मृत्यू वाढले आहे.
बिबट्याची निवांत झोपणे, शिकार करणे, शिकार निवांत खात बसणे, आळस देण्यापासून संपूर्ण दिनचर्या मनुष्य वावरामुळे आज प्रभावित झाली, म्हणूनच हल्ल्यांच्याही घटना वाढल्या. अर्थात बिबट्यांचा स्वभाव हा माणसाला मारणे नसून, त्याला टाळण्याचा आहे.
सेल्फ प्रोटेक्शनमुळे हे हल्ले होतात. त्याचे खाद्य हरीण, रानडुक्कर व तत्सम प्राणी असले, तरी तो प्रसंगी पक्षी आणि कुत्री खाऊनही जगतो. म्हणजेच, कोणत्याही परिस्थितीत गुजराण करतो.
संवर्धनाचा विचार केला, तर वाघांच्या तुलनेत बिबट्याला दुय्यम स्थान दिल्याचे दिसते. वाघ आणि बिबट्यांच्या मृत्यूच्या आकडेवारीची तुलना पाहता वाघांच्या मृत्यूच्या तुलनेत बिबट्याचे मृत्यूचे प्रमाण दोनशे पटीहून अधिक आहे.
ज्या जंगलात वाघ नाहीत, अशा अन्नसाखळीत बिबट प्राणी शिखर प्रजातीची भूमिका पार पाडतो. मात्र, काही मोजक्या जिल्ह्यातील वन व्यवस्थापन वगळता इतर ठिकाणी बिबट संवर्धनाच्या दृष्टीने फारशी गंभीरता दिसत नाही.
अशात आता गुजरातमधून महाराष्ट्रात बिबटे पाठविण्याचा निंदनीय प्रकार समोर येतो. प्राणवायू, पाणी आणि अन्न या व्यतिरिक्त वन्यप्राण्यांची तिसरी गरज नाही. मात्र, हक्काच्या घरात मानवी ढवळाढवळ वाढली.
परिणामी जंगलात खायला अन्न नाही अन् गावाकडे आलो, तर मानवाची आरडाओरड! म्हणजेच बिबट्या हा 'घर का ना घाट का, दुश्मन अनाज का' अशा दशेला सामोरे जात आहे.
म्हणूनच आता त्याचा नखभर राहिलेला अधिवास अवैध वृक्षतोड, गुरेचराई, अतिक्रमण, विकास प्रकल्प इत्यादीपासून दूर ठेवून त्यांना मोकळा श्वास घेऊ देण्याची गरज आहे.
५,२३९ बिबट्यांची शिकार १९९४ ते २०२३ या वर्षात झाली.
१,०८९ बिबटे २०२३ व २०२४ या दोनच वर्षात देशात मृत पावले.
बिबट्यांची संख्या किती?
१) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १९९८ मध्ये देशात बिबट्यांची संख्या अंदाजे ४५,००० होती. २०१५ मध्ये केवळ ७,९१० बिबटे होते, म्हणजे १७ वर्षात संख्येत ८२% घट झाली.
२) अलीकडील स्थिती पाहता २०१८ च्या अहवालानुसार देशातील बिबट संख्या १२,८५२ इतकी होती. २०२२ मध्ये ती १३,८७४ झाली, म्हणजे २०१८ च्या तुलनेत ८% वाढ झाली. यामध्ये सर्वाधिक ३,९०७ बिबटे मध्य प्रदेशात आहेत.
३) महाराष्ट्रात १९८५, तर कर्नाटकात १०७० बिबट्यांचा वावर आहे. २०२२ ची ही गणना देशातील २० राज्यांमध्ये झालेली होती. यामध्ये संरक्षित क्षेत्राव्यतिरिक्त वावरणाऱ्या बिबट्यांची संख्या किती हा देखील प्रश्नच आहे. अशात आता बिबट्याच्या नसबंदीचा विषय समोर येतो. मात्र, ही बाब कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका आहे.
दोघांनाही धोका
२०२२ ते २०२४ या काळात देशात बिबट्यांच्या हल्ल्यात ५९ लोक मृत्युमुखी पडले. मात्र, बिबट्या आणि मानव संघर्ष हा आजचा नाही. १८७५ ते १९१२ दरम्यान देशात ११,९०९ मानव आणि इतर पाळीव प्राणी मृत पावल्याच्या घटना घडल्याची नोंद आहे. १९८६ ते २००३ दम्यान एकट्या महाराष्ट्रातच ३४ जणांचे बळी गेले आहेत. अर्थात बिबट्याकडून मानवाला जसा धोका आहे. तसाच तो मानवाकडून बिबट्यालाही आहे.
यादव तरटे पाटील
माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ
अधिक वाचा: Hirvalichi Khate : हिरवळीचे खते जमिनीत नेमकी कधी आणि कशी गाडली पाहिजेत? वाचा सविस्तर