आवळा हे एक औषधी गुणधर्म असलेले महत्वाचे फळझाड आहे. त्यात सर्वात जास्त 'क' जीवनसत्त्व (५०० ते ७०० मिली/१०० ग्रॅम गर) असून, त्याचा मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधामध्ये वापर केला जातो. त्यातील च्यवनप्राश व आवळा चूर्ण ही प्रमुख आहेत. इतर पदार्थामध्ये आवळा सिरप, आवळा सुपारीचा समावेश होतो.
लागवडीसाठी आवश्यक जमीन आवळा हे उपयोगी फळझाड असून वरकस किंवा क्षारपड जमिनीतही चांगले येते. या पिकासाठी पाण्याचा होणाऱ्या साधारण आम्ल ते अल्कधर्मीय, मध्यम प्रकारच्या जमिनी चांगल्या मानवतात. हे पीक वरकस ते साधारण खारवट अशा हलक्या जमिनीत घेता येते; परंतु पाण्याचा निचरा न होणाऱ्या भारी जमिनी या पिकासाठी योग्य नाहीत.
हवामानया पिकासाठी कोरडे, समशीतोष्ण कटिबंधातील हवामान चांगले मानवते; परंतु कोकणातील दमट व उष्ण हवामानातही ते चांगल्या प्रकारे येते. आवळ्याची लागवड समुद्रसपाटीनुसार १३०० मीटर उंचीपर्यंत करता येते. आवळ्याचे झाड १० अंश ते ४६ अंश सेल्सिअस इतके तापमान सहन करू शकते.
जाती आणि लागवड- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे कृष्णा, कांचन, एन. ए -७, एन. ए. -१० आणि चकय्या या आवळ्याच्या सुधारित जातींची कोकणात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.- या पिकात परागीकरण होत असल्याने अधिक फळधारणेसाठी दोन ते तीन जाती एकत्रित लावणे जरुरीचे आहे.- आवळ्याची लागवड कलम लावून करावी कलम करण्यासाठी डोळा किंवा मृदकाष्ठ कलम पद्धती वापरतात.- लागवडीसाठी वापरलेली आवळ्याची जात, कलम आणि जमिनीचा मगदूर विचारात घेऊन दोन ओळीतील व दोन झाडांतील अंतर सात ते दहा मीटर ठेवावे.- कलम लागवडीनंतर पहिल्या व दुसऱ्या वर्षी खुंटावर येणारी (कलमांच्या फांद्या व्यतिरिक्त वाढणारी) फूट काढून टाकावी.
छाटणीआवळ्याच्या झाडाला वळण देणे आवश्यक आहे. यासाठी प्रथम जमिनीपासून ०.७५ ते १.०० मीटर उंचीपर्यंत एक मुख्य खोड सरळ वाढवावे व नंतर त्यावर पुढे चार दिशांना चार जोमदार फांद्या वाढू द्याव्यात. अशा प्रकारे आकार देण्यासाठी अतिरिक्त आलेल्या फांद्यांची छाटणी करावी पण दरवर्षी फळे देणाऱ्या झाडांची छाटणी करणे आवश्यक नाही. उन्हाळ्यात व हिवाळ्यात पाणी दिल्यास वर्षातून दोन हंगामात फळे मिळतात.
पिकाचा कालावधीकलम किंवा डोळा भरून अभिवृद्धी केलेल्या आवळ्याच्या झाडापासून सुयोग्य व्यवस्थापनामध्ये चौथ्या वर्षापासून फळे मिळण्यास सुरुवात होते आणि ५० वर्षापर्यंत मिळते. आवळ्याच्या झाडावर साल खाणारी अळी, खोड किडा, खवळे कीड व अनार बटरफ्लाय या किडी, तांबेरा, फांदीमर हे रोग येतात. एका झाडाला १५ वर्षांपासून स्थानिक जात असेल तर ४० ते १०० किलो तर सुधारित जात असेल तर ६० ते १५० किलो फळे मिळतात.